Raj Thackeray: राज ठाकरेंनी इच्छुकांची केली गोची; तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:01 IST2022-04-06T15:01:15+5:302022-04-06T15:01:42+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दिलेल्या ‘भोंगे हटाव’च्या नाऱ्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंनी इच्छुकांची केली गोची; तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे!
मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरेंनी दिलेल्या ‘भोंगे हटाव’च्या नाऱ्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. चांदिवली विधानसभा क्षेत्रातील असाच एक इच्छुक गेल्या दोन दिवसांपासून भयंकर टेन्शनमध्ये दिसून येत आहे. तो तयारी करीत असलेला मतदारसंघ मिश्र वस्तीचा.
गेल्या वर्षभरापासून एकेका मतदाराची मोट बांधायची कसरत सुरू असताना साहेबांच्या तासाभराच्या भाषणाने साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले. हा राग मनात धरून पक्ष बदलावा, तर शिवसेनेचा उमेदवार आधीच निश्चित झालेला; काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही आणि राष्ट्रवादीकडून निवडून येणार नाही, अशी स्थिती आहे.
साहेबांनी केलेल्या गोचीमुळे ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ असेच म्हणण्याची वेळ ओढावली आहे. राज ठाकरे यांच्या नाऱ्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.