Join us  

मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 8:14 AM

मराठी कार्ड मनसेचं कधीच नव्हतं, पक्षस्थापनेवेळी त्यांनी हा मुद्दा घेतला, त्यातही सातत्य नाही

ठळक मुद्देभाजपाला कधीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येत नाहीभगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व घेतलं असं होऊ शकत नाहीपाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले?

मुंबई - पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकला यासाठी मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं आहे. हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मनसेच्या या भूमिकेवर शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी सडकून टीका केली आहे. मनसेचा मोर्चा हा भाजपा पुरस्कृत आहे असं सांगत या मोर्चामुळे कुठेही शिवसेनेला फटका बसणार नाही असा दावा त्यांनी केला आहे. 

याबाबत एबीपी माझाशी बोलताना मनिषा कायंदे म्हणाल्या की, मनसेच्या मोर्चाचा शिवसेनेला फटका बसणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली १४ वर्ष मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे. या मोर्चामागे भाजपाचाच हात आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच काही दिवसांपूर्वी शहा-मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला फेका असं टोकाचा विरोध केला आता सौम्य झाले आहेत हे लोकांना दिसतं. भाजपाला कधीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येत नाही, त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या कायम लागतात. पहिलं वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आता मनसेला घेतायेत. भाजपाचे आशिष शेलार वारंवार कृष्णकुंजला भेटीगाठी करतात, त्यानंतर हा मोर्चा निघतो, या मोर्चामागे भाजपाचा हात असल्याची शक्यता आहे असंही मनिषा कायंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, मराठी कार्ड मनसेचं कधीच नव्हतं, पक्षस्थापनेवेळी त्यांनी हा मुद्दा घेतला, त्यातही सातत्य नाही, हिंदुत्वाचा मुद्दा मनसेने कधी आणला नव्हता, भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व घेतलं असं होऊ शकत नाही. लोकांनी भाषणात टाळ्या वाजवल्या, मनोरंजन केलं पण लोकांना आता कळालं आहे. त्याचबरोबत आगामी महापालिका निवडणुकीतही याचा परिणाम होणार नाही. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली, कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या धर्तीवर हे सरकार सुरु आहे. लोकांना हे सरकार आवडलं आहे. संभाजीनगरमध्ये मनसे पाऊलच ठेऊ शकत नाही असा दावा शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :मनसेउद्धव ठाकरेराज ठाकरेशिवसेनाभाजपाहिंदुत्व