MNS Vs Uddhav Thackeray Group: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतची चर्चा आता जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु, एकीकडे ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र मनसेच्या एका बड्या नेत्याने मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या मनसे नेत्याच्या हाती शिवबंधन बांधले.
उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत तसेच अन्य महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मनसेशी संभाव्य युतीबाबत अतिशय सकारात्मक पाहायला मिळत आहे. तसेच मनसेचेही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटासोबत एकत्र येताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळात तसेच या दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाशी युती करण्यास मनसे सकारात्मक असल्याचे सांगितले. परंतु, यानंतर अवघ्या काहीच मिनिटांत मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर केली जाऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पावले उचचली आहेत. वैभव दळवींचा पक्षप्रवेश हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पोहोचले. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वैभव दळवी यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मनसेतून आलेल्या वैभव दळवी यांच्या हाती शिवबंधन बांधले. वैभव दळवी हे मनसेचे अंधेरी पूर्वचे पदाधिकारी होते. काही दिवसांपासून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या समर्थकांसह उद्धवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे अनिल परब आणि इतर प्रमुख नेते हजर होते. वैभव दळवी यांच्यासह ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांची उद्धवसेनेत घरवापसी झाली आहे. शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि ठाकरे गटात परतल्या. यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटातील कारभारावर जोरदार टीका केली.
वैभव दळवी यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर संदीप देशपांडे यांची स्पष्ट प्रतिक्रिया
वैभव दळवी यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना त्यांचे पदाधिकारी फसवत आहेत. उद्धव ठाकरे यांना बरे वाटावे म्हणून मनसेचा पदाधिकारी फोडला, असे सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून क्रॉस चेक करून घ्यावे. हा आमचा पदाधिकारी नाही. २०१४ ला हा आमचा पदाधिकारी होता. त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. २०१४ ते २०२५ या कालावधीत तो ना मनसेच्या बॅनरवर आहे, ना आमच्या कोणत्या पदाचे पत्र त्याला गेले आहे. उलटपक्षी तो थोडासा बदनाम व्यक्ती आहे. त्याच्यावर ३५४ सारख्या केसेस आहेत. तो आमचा पदाधिकारी नाही. तरी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून चेक करून घ्यावे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.