Join us

"म्हटलं होतं ना, संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर बसवतील पण..."; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:12 IST

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपासह औरंगाबाद शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. पाणीप्रश्नाला मी सामोर जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. मी प्रामाणिक आहे. पूर्वी दहा दिवसांपूर्वी पाणी यायचं आता हे दिवस कमी कमी होत चालले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. 

शिवसेनेच्या मंचावर छत्रपती संभाजी राजेंचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. त्यातच उद्धव ठाकरे शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याबाबत मोठी घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवरच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत टोला लगावला आहे.

''म्हटलं होतं ना, संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर बसवतील पण नामांतराची घोषणा मात्र करणारच नाही'', असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. 

दरम्यान, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून ही जनता माझ्यावर प्रेम करतेय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. बाबरी मशीदीचं आंदोलन करताना जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा नारा होता. बाबरी पाडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तुम्ही संसदेत कायदा केला नाही. तुमचं हिंदुत्वासाठी कर्तृत्व काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला-

आज सगळंकाही ठीक असताना भाजपा कुणालातरी सुपारी देते, हनुमान चालीसा पुढे आणते, भोंगा आणतं, थडग्यावर नतमस्तक व्हायला लावतं. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, हा देश माझा धर्म म्हणून घराबाहेर पाऊल टाकायचं. जर कुणी धर्माचं वेड घेऊन आम्ही देशाभिमानी हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष आम्ही करत नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामनसे