पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:49 IST2025-01-07T14:49:19+5:302025-01-07T14:49:43+5:30

MNS Chief Raj Thackeray: योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे सांगताना मनसे नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे.

mns leader sandeep deshpande told about on its own again or now an alliance what decision raj thackeray to take about upcoming municipal elections | पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय?

पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय?

MNS Chief Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरून पुढे जात आता महापालिका निवडणुकीत कंबर कसून तयारीला लागण्याचा पवित्रा मनसेने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी विविध गोष्टींचा आढावा घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांना महत्त्वाची माहिती दिली. 

 विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले असून, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुका झाल्या. आता महापालिका निवडणुका आहेत. त्याला कशा प्रकारे सामोरे जायचे, यासाठी मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पक्ष संघटनात मोठे बदल करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी घेतला आहे. तो पूर्ण बदल कशा पद्धतीचा असेल, काही दिवसांत हे येणाऱ्या काही दिवसांत दिसेल, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. 

पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असेल? पुन्हा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय होणार की, राज ठाकरे युतीत निवडणुका लढवणार, याबाबत चर्चा आहे. याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, या बैठकीत प्रामुख्याने पक्षांतर्गत काय बदल झाले पाहिजेत, काय सुधारणा झाल्या पाहिजेत, यावर भर देण्यात आला होता. यावर सविस्तर चर्चा झाली. युतीच्या संदर्भातही निश्चितपणे विचार झाला. याचाही निर्णय येणाऱ्या काही दिवसांत आम्ही घेऊ, असे संदीप देशपांडे यांनी नमूद केले. तसेच येणाऱ्या काही दिवसांत आणखी बैठका होणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत मीडियामध्ये अधिक चर्चा आहेत. पक्षांतर्गत अशी कोणतीही चर्चा किंवा असा सूर जाणवला नाही. युती करायची की नाही करायची आणि केलीच तर ती कोणासोबत करायची, याचा निर्णय राज ठाकरे घेणार आहेत, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई महापालिकेसह अन्य अनेक ठिकाणी निवडणुका होणार आहेत. काही ठिकाणी भाजपा असेल किंवा ठाकरे गट असेल स्वबळावर लढण्याबाबत विचार करत आहेत. याबाबत मनसे काय भूमिका घेणार, अशा आशयाचा प्रश्न संदीप देशपांडे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, निश्चितपणे पक्षांतर्गत यासंदर्भात विचार, चर्चा होत असतात. त्यावरही विचारमंथन सुरू आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: mns leader sandeep deshpande told about on its own again or now an alliance what decision raj thackeray to take about upcoming municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.