Join us

'आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर; यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी'; मनसेचा महापौरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:11 IST

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवरुन टोला लगावला आहे.

मुंबई: मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्या समोर आल्याची माहिती दिली होती. यासंदर्भातील ट्विटवर एका नेटिझननं हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं कुणाला दिलं? असा सवाल केला होता. त्यावर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’असं उत्तर दिलं होतं. किशोरी पेडणेकरांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आणि महापौरांवर टीकेची झोड उठवण्यात आली.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवरुन टोला लगावला आहे. 'आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर, यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्विटरद्वारे टोला लगावला आहे. 

तत्पूर्वी, किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्या मोबाईलवरुन एका कार्यकर्त्यानं ते ट्वीट केलं होतं. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. त्याची मी हकालपट्टी केली आहे", अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली आहे.

“ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मी माझा मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्यानं तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं. या प्रकरणातून आता मला एक प्रकारचा धडा मिळाला आहे. यापुढील काळात याबाबत मी काळजी बाळगेन", असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. 

काय आहे हे प्रकरण?

किशोरी पेडणेकर यांनी एका चॅनेलला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट केली होती. त्यात त्यांनी मुंबईसाठी १ कोटी लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यात ९ कंपन्यांचा उल्लेख केला होता. या ट्वीटखाली एका व्यक्तीनं 'कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं?' असा प्रश्न विचारला असता, महापौरांनी उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. काही वेळानं हा रिप्लाय डीलीट करण्यात आला. मात्र आता त्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :संदीप देशपांडेकिशोरी पेडणेकरमुंबई महानगरपालिकामहापौरशिवसेनामनसे