Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्यासाठी शिवसेनेचा डाव; मनसेचा आरोप, शिवसेनेचंही प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 19:37 IST

रस्त्यांच्या कामासाठी सुमार १२०० कोटींचे कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या.

मुंबई- रस्त्यांच्या कामासाठी काळ्या यादीतील ठेकेदारांचा मार्ग खुला करण्याकरिता अटींमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी केला. शिवसेना निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्यासाठी असले उद्योग करीत असल्याचा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेतून लगावला. मात्र निवडणुकीच्या काळात अशी अनेक बेडकं बाहेर येतात, असे प्रत्युत्तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे. 

रस्त्यांच्या कामासाठी सुमार १२०० कोटींचे कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या. मात्र त्यात ३० टक्के कमी खर्चाची बोली ठेकेदारांनी लावल्याने त्या निविदा रद्द करीत नवीन निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र यासाठी अटींमध्ये काही फेरफार करण्यात आली आहे. याबाबत नाराजी व्यक्त करीत २०१६ मध्ये काही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यानंतर एक नियोजित निविदा प्रणाली सुरु झाली. आता अनेक ठेकेदाराना निविदेमध्ये सहभागी होता येते. 

मात्र आता १२०० कोटींचे रस्त्याचे काम देताना मास्टिक  प्लँटसोबत त्याचा सामंजस्य करार असल्यास ते काम मिळेल अशी अट ठेवण्यात आली आहे. मात्र काळ्या यादीत असलेल्या ठेकेदारांकडेच हे मास्टिक प्लँट आहेत. त्यामुळे हे ठेकेदाराच निविदा भरु शकतील, अशी शंका देशपांडे यांनी व्यक्त केली. काळ्या यादीतील ठेकेदारांना काम मिळावे, म्हणूनच प्रशासन आणि शिवसेना हे षडयंत्र रचले आहे. शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे असल्याने पालिकेने निविदा प्रकियेत बदल करुन काळ्या यादीतील ठेकेदारांसाठी पालिकेचे द्वार खुले केले आहे. 

पालिकेतील विरप्पनकडून रस्त्यांची लुटमार-

या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेची भूमिका काय? हे जाहीर करावे. पालिकेतील विरप्पन रस्त्याच्या कामात लुटमार करत आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. “पालिकेत विरप्पन गँग कोण हे सर्वांना माहित आहेत. सेनेच या काळ्या यादीतील ठेकेदारांवर कसले प्रेम आहे हे आता जाहीर करावे,” असे आव्हान त्यांनी केले. याप्रकरणात लक्ष न घातल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेशिवसेनामुंबई महानगरपालिका