Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 11:53 IST

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे.

मुंबई: पक्षाचे नाव आणि चिन्ह यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शुक्रवारी झाला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला.

यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वातील 'बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष व त्यांचे ढाल- तलवार हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष व त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह यांची मुदत केवळ चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे. 

उद्धव ठाकरेंकडून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. याचदरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे. आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की स्वाभिमानासाठी आमदारकीवर लाथ मारणार?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. 

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. नाव आणि पैसा… पैसा येतो पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा नाव गेलं की ते पुन्हा येऊ शकत नाही. काळ्या बाजारात सुद्धा मिळत नाही. म्हणून नावाला जपा, नावाला मोठं करा, असं बाळासाहेब ठाकरे त्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

निवडणूक आयोगाचा निर्णय घातक- उद्धव ठाकरे

निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेसंदीप देशपांडेशिवसेनाएकनाथ शिंदे