“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:40 IST2025-10-30T13:38:29+5:302025-10-30T13:40:41+5:30
MNS Sandeep Deshpande News: घोळ सगळीकडे आहे. तो कोणाच्या फायद्याचा आहे, हे आपल्या लक्षात आलेच असेल, असे मनसे नेते म्हणाले.

“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
MNS Sandeep Deshpande News: गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चाचे नियोजन सुरू आहे. विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष यांची बैठक झाली. त्यात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आता शाखांच्या बैठका सुरू आहेत. मोर्चाच्या नियोजनाची तयारी जवळपास पूर्ण होत आहे. पाऊस असला, तरी मोर्चा निघणारच, असा निर्धार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बोलून दाखवला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधत मोर्चाबाबत माहिती दिली. मतदारयादीतील घोळाचे इतके पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरे म्हणजे भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारलेले नाहीत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत. उडता भाला कशाला अंगावर घेता, अशी विचारणा करत संदीप देशपांडे यांनी भाजपावर टीका केली.
हा घोळ सगळीकडे आहे
कांदिवलीसह अनेक ठिकाणी गुजरातींची नावे मतदारयादीत असल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, हा घोळ सगळीकडे आहे. कच्छ असेल, गुजरात असेल, बिहार असेल, अनेक ठिकाणची नावे इथे घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो कोणाच्या फायद्याचा आहे, हे आपल्या लक्षात आलेच असेल. या सर्व गोष्टींवर आमचे महाराष्ट्रसैनिक, शिवसेनेचे शिवसैनिक एकत्ररित्या काम करत आहेत, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
दरम्यान, मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडीने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, यामध्ये मनसेही सहभाग होणार आहे. हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही, तर खऱ्या मतदारांसाठी आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. गल्ली ते दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा. आयोजन ठोस, प्रभावी आणि न भूतो न भविष्यती असावे, असे निर्देश राज ठाकरे यांनी दिले.