Join us  

'आता आम्हाला त्या अधिकारी अन् पोलिसाला कपडे काढून चोप द्यावा लागेल'; मनसेचा इशारा

By मुकेश चव्हाण | Published: March 03, 2021 1:11 PM

महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई/जळगाव : जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणावरुन मनसेने संबंधित पोलीस आणि अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. 

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील फेसबुकद्वारे म्हणाल्या की, जळगाव महिला वसतिगृहमध्ये पोलिसांसमोर महिलेला कपडे काढून नाचवत आहे. या प्रकरणाला संबंधित विभाग जबाबदार आहे. त्यामुळे सदर पोलीसाला आणि अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित करा, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. अन्यथा आता आम्हाला त्या पोलिसाला आणि संबंधित अधिकाऱ्याला कपडे काढून मनसे चोप द्यावा लागेल, असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे. 

जळगाव महिला वसतिगृह मध्ये पोलीसा समोर महिलेला कपडे काढून नाचवत आहे  त्या पोलिसाला आणि महिला वसतिगृह लावणारे डिपार्टमेंट...

Posted by Rupali Patil Thombare on Tuesday, 2 March 2021

तत्पूर्वी, सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. 

काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरूनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.

सदर घटनेची चौकशी चालू आहे-

जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशी झाल्यानंतर दोन दिवसांत तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी आज अधिवेशनात दिले आहे. 

आता एकच पर्याय, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट- सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात म्हणाले की, आमच्या राज्यातील आई- बहिणींना नग्न करुन नाचायला लावलं जात आहे. यासंबंधिचे सर्व व्हिडिओ देखील असताना तुम्ही आम्ही नोंद घेऊ, असं सांगतात अशी टीका सुधीर मुनगंटीवार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली आहे. यासोबतच आता राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. यासाठी मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई- बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला आहे.

टॅग्स :जळगावपोलिसमहाराष्ट्र सरकारमनसे