Join us  

वांद्रे प्रकरणी अटक केलेल्या विनय दुबेने पोस्ट केला राज ठाकरेंसोबतचा फोटो; मनसे म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:55 PM

विनय दुबे यांनी राज ठाकरेंसोबत असणारे अनेक फोटो आपल्या फेसबुकवर पोस्ट केले आहेत

मुंबई: कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० ते १००० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संबंधित अफवा पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विनय दुबेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र विनय दुबेला अटक झाल्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे आणि विनय दुबे यांचे काही फोटो व्हायरल होत आहे. 

विनय दुबे यांनी राज ठाकरेंसोबत असणारे अनेक फोटो आपल्या फेसबुकवर पोस्ट केले आहेत. विनय दुबे उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष देखील आहे. त्यामुळे विनय दुबे यांनी राज ठाकरेंना उत्तर भारतीयांबद्दल मनसेची नक्की भूमिका काय आहे हे पटवून देण्यासाठी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. राज ठाकरेंनी देखील हे आमंत्रण स्विकारुन मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी काढलेले फोटो देखील विनय दुबे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. 

राज ठाकरे आणि विनय दुबेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मनसेने विनय दुबे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केले आहे. मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन यासंबंधित माहिती दिली. राज ठाकरे यांनी विनय दुबे यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधायला बोलावलं होतं. वांद्रे घटना, दुबे आणि मनसे असा बादरायण संबंध लावण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो चुकीचा आहे असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

विनय दुबे लोकसभा निडणुकील कल्याण मतदारसंघातून अपक्ष म्हणून मैदानात उतरला होता. राज ठाकरेंसोबत कार्यक्रमात उपस्थित असल्याने आपल्याला मनसे समर्थक पाठिंबा देतील असा विश्वास त्याला होता. पण निवडणुकीत शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिदेंनी विनय दुबेचा दारुन पराभव केला होता.

दरम्यान, फेसबुकवरून विनय दुबेने मजुरांना उद्देशून एक व्हिडीओ १२ एप्रिल रोजी पोस्ट केला होता. यात त्याने मजुरांना आता मदतीसाठी नाही तर गावी जाण्यासाठी लढण्याचे आवाहन केले. शिवाय याविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक शेअर केला आहे. हा व्हिडीओ १६ हजारांहून अधिक जणांनी शेअर केला होता. तसेच यापूर्वी परप्रांतीयांसाठी विशेष ४० बसेसची व्यवस्था केल्याचा व्हिडीओही अपलोड केला होता. तो २१ हजार लोकांनी शेअर केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याने अशा प्रकारे मोहीम छेडल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराज ठाकरेमनसेपोलिसअटक