Join us  

'शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'; मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 2:59 PM

मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबई: आगमी मुंबई महानगरपालिकानिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने विभागवार कार्यकर्ता मेळावा घेत रणशिंग फुंकले आहे. तसेच येत्या दोन महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वंच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 

आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपाच्या तगड्या आव्हानासमोर शिवसेनेनं मुंबई महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. 

शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मेळाव्यासाठी शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. मात्र शिवसेनेच्या या रणनीतीवर मनसेने टोला लगावला आहे. 

मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे. ''मुंबई मा जलेबी ने फाफडा,उद्धव ठाकरे आपडा... शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'' असं म्हणत कीर्तिकुमार शिंदे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या गुजराती बांधवांच्या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पोस्टरच्या माध्यमातून गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी ‘केम छो वरळी’ असं गुजराती भाषेतील पोस्टर लावण्यात आले होते. 

काँग्रेसकडूनही मुंबईत संघटनात्मक बदल-

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेसकडून मुंबईत संघटनात्मक बदल करण्यात आले होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची काँग्रेसने नियुक्ती केली आहे. 

भाजपाकडून आमदार अतुल भातखळकर-

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपानं कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपाने जाहीर केलेले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमनसेशिवसेनामुंबई महानगरपालिकानिवडणूकमहाराष्ट्र सरकार