Join us  

'नितीन नांदगावकर माझा पुतण्या; राज ठाकरेंनीही कौतुक केलं होतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 5:01 PM

नितीने खूप कामं केली पण थोड्या चुकाही केल्या होत्या.

मुंबई: धडाकेबाज आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले नितीन नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. मनसे पक्ष सोडल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे हे खूप चांगले आहेत. पण त्यांच्या जवळ असणारे नेते हे कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाहीत. माझ्याबाबतीत देखील असंच झालं. याच नेत्यांनी रचलेल्या षडयंत्रामुळे मी मनसेतून बाहेर पडलो असा आरोप नितीन नांदगावकरांनी केला होता. मात्र नितीनवर मनसेत कोणत्याच प्रकारचा अन्याय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत नितीन नांदगावकर यांना विक्रोळी मतदारसंघाचे तिकिट देण्यास हरकत नसल्याचे विक्रोळी मतदार संघातील नेते व कार्यकर्त्यांनी सांगितले होते. यानंतर मी स्वत: नितीन नांदगावकरला बोलावून त्याला विक्रोळी मतदारसंघातून तुला निवडणुक लढवायचे आहे असं सांगितलं. मात्र नितीनला स्वत:हून निवडणुक लढवायची इच्छा नव्हती. पण पक्ष निवडणुकीचा खर्च करण्यास तयार असेल तर मी निवडणुक लढवेन असं नितीनने सांगितले. परंतु पक्षाकडून जेवढं शक्य आहे तेवढा खर्च करण्यात येईल असं नितीनला सांगितले. कारण पूर्ण खर्च करणं पक्षाला शक्य नसतं असं त्याला सांगण्यात आल्याचं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं. 

नितीन नांदगावकर विविध ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ करुन एखाद्याच्या कानाखाली मारणं चुकीचं असल्याचे त्याला सांगितले होते. या प्रकरणामुळेचं त्याला तडीपारची नोटीस देखील आली होती. नोटीस आल्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी मला फोन करुन प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच नितीन नांदगावकर यांच्यावर मनसेत कोणत्याच प्रकारचा अन्याय झाला नाही. नितीन माझा पुतण्या असून राज ठाकरे यांनी देखील त्याचे अनेकवेळा कौतुक केले असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे नितीने खूप कामं केली पण थोड्या चुकाही केल्या होत्या. तसेच नितीनला सांभाळून राह असं देखील सांगितलं होतं असं बाळा नांदगावकर यांनी सांगतिले.

नितीन नांदगावकरांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले होते. तसेच अनेकांना हाच प्रश्न पडला होता की, नितीन नांदगावकर शिवसेनेत कशामुळे? विधानसभेची उमेदवारी न दिल्यानेच त्यांनी सेनाप्रवेश केल्याचंही बोललं जात होतं. मात्र ''राज ठाकरे हे दैवत होते, आहेत अन् राहणार. पण, त्या राजसाहेबांना ज्या साहेबांनी शिवसेना सोडली, त्या बडव्यांना घेतलं होतं. मला राजसाहेबांबद्दल काहीच बोलायच नाही, ते दैवतच आहेत. पण, आजूबाजुच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला,'' असे स्पष्टीकरण नितीन नांदगावकरांनी केले होते.मनसेस्टाइल खळ्ळ खटॅक आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. तसेच त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्याय मिळवून दिला होता. 

टॅग्स :राज ठाकरेबाळा नांदगावकरमनसेशिवसेनामहाराष्ट्रमुंबई