"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 10:43 IST2025-09-01T10:03:58+5:302025-09-01T10:43:41+5:30
मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
Amit Thackery on Maratha Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सशर्त परवानगी दिली आहे. राज्यभरातून हजारो मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागल्यानंतर आता प्रत्येक ठिकाणाहून त्यांना मदत पुरवली जात आहे. अशातच मनसे नेते अमित ठाकरे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना अन्नपाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण चौथ्या दिवशीही सुरू असून ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारी पातळीवर बैठका सुरु असून लवकरच त्यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे रोज मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्या पिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना त्यांना अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमित ठाकरे यांनी एक्स पोस्टवरुन
"माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे," असं अमित ठाकरे म्हणाले.
"माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे," असंही अमित ठाकरेंनी म्हटलं.