Join us

“शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली; पिक्चर अभी बाकी है”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 09:39 IST

भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं

मुंबई : महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये, अशी टीका सामनामधून मनसेवर करण्यात आली आहे. त्यामुळे या टीकेला आता मनसेकडूनही उत्तर देण्यात आले आहे. शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली असल्याचा खोचक टोला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी लगवाला आहे.

‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले. पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.

यावरूनच खोपकर यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, "शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने राऊतांची तंतरली आहे. त्यामुळे त्यांना अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च करावा लागला असून, यासाठी ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा, असे म्हणत खोपकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.