सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 07:05 PM2021-10-22T19:05:50+5:302021-10-22T19:14:57+5:30

विनायक राऊत यांच्या या टीकेला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

MNS leader Akhil Chitre has criticized Shiv Sena leader Vinayak Raut and Shiv Sena | सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

Next

मुंबई: अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी कांचनगिरी यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, असं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका त्यांनी केली होती. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं, असं मत देखील कांचनगिरी यांनी व्यक्त केलं होतं. 

कांचनगिरी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलेलं आहे. परप्रांतियांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारायचं, बिहारी लोकांची सालटी काढायची हे धंदे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच भाजप राज ठाकरेंना शिवसेनेशी लढण्यासाठी शिखंडीसारखा वापर करत असतील, तर ते योग्य ठरणार नाही. उलट भाजपची सर्व मतं शिवसेनेकडे येतील, असा दावा देखील विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे. 

विनायक राऊत यांच्या या टीकेला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे, त्यामुळे तुमच्यातला जरासंधचा उभा चिरून वध करणं आम्हाला सहज शक्य आहे. तोपर्यंत तुम्ही कधी भाजपाबरोबर, तर कधी काँग्रेसबरोबर युत्या, आघाड्या करून श्रीखंड खात रहा, असं म्हणत लवकरच रणशिंग फुंकल जाईल, असा इशारा देखील अखिल चित्रे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

...तर मनसेनं भाजपासोबत जावं-  गुरू माँ कांचनगिरी

राज ठाकरे यांनी भाजपासोबत जावं का? असं विचारण्यात आलं असता कांचनगिरी यांनी महत्त्वाचं विधान केलं. "मी हिंदूराष्ट्रासाठी काम करत आले आहे आणि यापुढेही करत राहिन. राजकाराणाबाबत मला माहित नाही. मी साध्वी आहे. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं. कारण देशात सध्या नवं हिंदुत्व जन्माला येतंय आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडेल. त्यामुळे सर्व हिंदुंनी एकत्र यायला हवं", असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या होत्या. 

राज ठाकरे अयोध्येला जाणार-

राज ठाकरे यांची डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याची इच्छा असल्याचंही कांचनगिरी यांनी सांगितलं. "राज ठाकरे यांचा डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचं अयोध्येत मोठं स्वागत करू, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी हिंदूराष्ट्राच्या मजबूतीसाठी अयोध्या दौरा करायला हवा", असं कांचनगिरी म्हणाल्या होत्या. 
 

Web Title: MNS leader Akhil Chitre has criticized Shiv Sena leader Vinayak Raut and Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app