Join us  

Maharashtra Political Crisis: “शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 2:52 PM

Maharashtra Political Crisis: शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राजसाहेब दिसू लागले आहेत, असा टोला मनसेकडून लगावण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानंतर मोठे भगदाड शिवसेनेला पडले आहे. मात्र, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा सुरू आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. मात्र, शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहे. यातच शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरे का? असा खोचक सवाल मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केला आहे. 

आगामी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार असून, १५० जागांवर उमेदवार निवडून येतील, असा दावा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी करताना मनसेवर निशाणा साधला होता. राज ठाकरे उद्या कोणाच्याही व्यासपीठावर दिसतील. याबाबत नवखे असे काही राहणार नाही. ते फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत, त्या व्यासपीठावर येणार नाहीत. यामुळे पक्षाला कोणती विचारधाराच राहिलेली नाही हेच स्पष्ट होते, असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला होता. यानंतर आता यावर पलटवार करताना गजानन काळे यांनी शिवसेना अन्य संघटना, पक्षांशी करत असलेल्या युतीवरून बोचरी टीका केली आहे. 

शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरे का?

गजानन काळे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, माजी महापौर ताई पुन्हा बरळल्या. शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे व राजसाहेब दिसू लागले आहेत. आता यांच्या शिल्लक सेनेच्या पक्षप्रमुखांनी अबू आझमीच्या समाजवादी पक्षाशी युती केली तरी महाराष्ट्राला नवल वाटणार नाही. शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरे का? असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे. तत्पूर्वी केलेल्या ट्विटमधूनही गजानन काळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवतीर्थावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप नेते भेटून काय गेले शिल्लक सेनेच्या शिल्लक नेत्यांच्या बुडाला खूपच आग लागली, असे दिसतेय. यांनी सगळे गुंडाळून असंगाशी संग केलेला चालतो. बाळासाहेबांचे विचार गुंडाळून राष्ट्रवादीची लाचारी चालते आणि विचार, निष्ठा, हिंदुत्वची प्रवचन मनसेला देणार, असे गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, हिंदुत्व, मराठीला बगल देवून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणे, विधानपरिषदेला अंबादास दानवे MIM नगरसेवकांच्या जीवावर निवडून आणणे आणि राज्यसभेला MIM ची मदत घेणे. याला लाचारी म्हणतात ताई. डोक्यात कांदे भरून इच्छा आकांक्षा, मनिषा पूर्ण करायचे उद्योग तुमच्या शिल्लक सेनाप्रमुख यांनी केले आहेत, या शब्दांत गजानन काळे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळमनसेराज ठाकरेउद्धव ठाकरे