“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:14 IST2025-10-15T14:14:38+5:302025-10-15T14:14:52+5:30
Raj Thackeray PC News: निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी २०२४ मधील मतदार यादीतील तपशीलच दाखवला.

“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
Raj Thackeray PC News: निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांमध्ये मोठे घोळ आहेत. या सगळ्याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली आहे. परंतु, राज्य निवडणूक आयोग हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवत आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोग संबंधित काम राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे सांगत आहे. गेल्या ५ वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, अजून ६ महिने निवडणुका लांबल्या तरी अडचण काय, असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मतदार हा गोपनीय कसा असेल, तुम्ही याद्या जाहीर करता. मतदान गोपनीय असते. निवडणूक आयोगाचा घोळ काही कळत नाही. २०२२ च्या याद्या नाव आणि फोटोंसह आहेत आणि आताच्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकले आहेत. हे सगळे निवडणूक आयोग करत आहे आणि ते हे का करत आहेत, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.
दोन याद्या राज ठाकरे यांनी दाखवल्या
मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि बुधवारी पुन्हा राज्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग हे फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात. परंतु, राजकीय पक्ष प्रत्यक्ष निवडणुका लढवतात. परंतु, निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे. आम्ही तुम्हाला याद्याच दाखवणार नाहीत, असे सांगत २०२४ च्या निवडणुका व्हायच्या आधी आणि नंतर अशा दोन याद्या राज ठाकरे यांनी दाखवल्या.
यादीत काय प्रकारचा घोळ आहे, ते समजेल
२०२४ मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यातील तपशील सांगतो. त्यामुळे यादीत काय प्रकारचा घोळ आहे, ते समजेल. मतदारसंघ १६० कांदिवली पूर्व नाव धनश्री कदम, वय -२३, वडिलांचे नाव दीपक कदम, वय - ११७, मतदारसंघ १६१ चारकोप, नंदिनी चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय - १२४, महेंद्र चव्हाण यांच्या वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय ४३ कोणी कोणाला काढले तेच कळत नाही, असे राज ठाकरे यांनी सांगताच एकच हशा पिकला. तसेच २०२४ नंतर निवडणूक आयोगाने जी मतदारयादी जाहीर केली, त्यात फक्त नावे येत आहेत. यापूर्वी ज्या मतदारयाद्या येत होत्या, त्यात नावे, पत्ता आणि फोटो सगळेच येत होते, याकडेही राज ठाकरेंनी लक्ष वेधले.
दरम्यान, आम्ही भेटल्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना नोटिफिकेशन काढून ८ दिवसांची मुदत दिली. हे नोटिफिकेशन रद्द करावे आणि योग्य मुदत द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. तुम्ही दुरुस्तीसाठी ६-६ महिने घेणार आणि आम्ही ८ दिवसांत छाननी करून द्यायची, हे शक्य नाही. निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते, हे आम्ही पाहतो आणि यानंतर सर्व पक्षांचा काय निर्णय होतो, ते आम्ही कळवतो. मतदारयाद्यांच्या बाबतीत राजकीय पक्षांचे समाधान व्हावे. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.