“EVM नाही, पराभवाला आपणच जबाबदार”; अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, राज ठाकरेंशी असहमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:13 IST2025-02-20T15:12:07+5:302025-02-20T15:13:50+5:30

Amit Thackeray Reaction On EVM: अमित ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडत पदाधिकाऱ्यांना ठणकावून काही गोष्टी सांगितल्या. तर, ईव्हीएमवर वेगळे मत व्यक्त केल्याने राज ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

mns chief raj thackeray son amit thackeray state clearly that we are responsible for the defeat not evm | “EVM नाही, पराभवाला आपणच जबाबदार”; अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, राज ठाकरेंशी असहमत?

“EVM नाही, पराभवाला आपणच जबाबदार”; अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, राज ठाकरेंशी असहमत?

Amit Thackeray Reaction On EVM: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेसाठी अतिशय धक्कादायक होते. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीत उतरवले होते. परंतु, अमित ठाकरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता मनसे पक्षाची मान्यता राहणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या संदर्भात शंका उपस्थित केली होती. परंतु, वडिलांच्या भूमिकेशी फारकत घेत, अमित ठाकरे यांनी वेगळे मत व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. 

विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपाला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा? ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले? ४ महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांचा रोख ईव्हीएमकडे असल्याचे बोलले जात होते. यानंतर आता अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाला आपणच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

EVM नाही, पराभवाला आपणच जबाबदार

निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले, तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे स्पष्ट मत आहे. पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार असेल असे पक्षातीलच पदाधिकाऱ्यांचे मत असेल तर ते सिद्ध करून दाखवा, असे अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे एका बैठकीत सांगितल्याचे समजते. यानंतर आता अमित ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेलाच छेद दिल्याचे बोलले जात आहे. तसेच लवकरच विधानसभा मतदारसंघनिहाय दौरा करणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक पदाधिकाऱ्याशी थेट संवाद साधणार आहे. महापालिका निवडणूक अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे, अशा भावनेतून आपल्याला कामाला लागायला हवे, असे अमित ठाकरेंनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला

निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी अमित ठाकरे यांनी पराभवासाठी आपणच जबाबदार असल्याचे सांगितल्याचे समजते. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रणेस दोष देण्याचा प्रयत्न केला, त्यावर अमित यांनी हे आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला, मतदारसंघात अवघ्या १५ दिवसांत घरोघरी पोहोचू शकलो नाही, अशी खंत अमित ठाकरेंनी व्यक्त केल्याचे कळते. विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडणाऱ्या विभाग अध्यक्षांनाही अमित यांनी खडे बोल सुनावले. पदाची जबाबदारी पेलवत नसेल तर पदाचा राजीनामा द्यावा आणि ज्यांना काम करायचे आहे त्यांना संधी द्यावी, असे अमित ठाकरे यांनी ठणकावून सांगितल्याचे समजते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल विसरून महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश मनसैनिकांना देण्यात आले आहेत. वरळीतील मेळाव्यात नेते, विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आचारसंहिता लागू करून पदांमध्ये बदल करून निराश लोकांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे या आचारसंहितेची उत्सुकता लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच पक्षाची आचारसंहिता बनवित आहेत. आताही पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून आराखडा तयार करीत आहेत. यामुळे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना पक्षात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: mns chief raj thackeray son amit thackeray state clearly that we are responsible for the defeat not evm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.