Join us

“विधानसभेला झाले ते विसरा, महापालिका निवडणूक तयारीला लागा”; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:07 IST

MNS Chief Raj Thackeray: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली.

MNS Chief Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला होता. सत्तेत सहभागी होण्याची मनीषा धरत महायुतीसोबत असल्याचे सूतोवाच सातत्याने केले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेला फार मोठा धक्का बसला. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसेचा एकमेव आमदार असलेले राजू पाटील हेही पराभूत झाले. यानंतर आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मनसैनिकांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांना नशीब आजमावत होते. परंतु, सदा सरवणकर यांनी शेवटपर्यंत उमेदवारी मागे घेतली नाही. परिणामी माहीममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली. याचा फायदा ठाकरे गटाला झाला आणि महेश सावंत निवडून आले. मनसेच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे अद्यापही समोर आलेले नाहीत. मनसेकडून पराभवाचे चिंतन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यातच आता विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरून पुढे जात आता महापालिका निवडणुकीत कंबर कसून तयारीला लागण्याचा पवित्रा मनसेने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

विधानसभेला झाले ते विसरा, महापालिका निवडणूक तयारीला लागा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी विविध गोष्टींचा आढावा घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले असून, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत काही माहिती दिली. विधानसभा निवडणुका झाल्या. आता महापालिका निवडणुका आहेत. त्याला कशा प्रकारे सामोरे जायचे, यासाठी मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पक्ष संघटनात मोठे बदल करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी घेतला आहे. तो पूर्ण बदल कशा पद्धतीचा असेल, काही दिवसांत हे येणाऱ्या काही दिवसांत दिसेल, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासंदीप देशपांडेमहानगरपालिका निवडणुक 2022