Raj Thackeray Meet CM Devedra Fadnavis: ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. ठाकरे बंधूंचा २१-० ने पराभव झाल्यानंतर भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली. यातच बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज ठाकरे सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याचे समजते. यानंतर लगेचच राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानावरून निघून शिवतीर्थवर गेल्याचे सांगितले जात आहे. या भेटीचे निश्चित कारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी याबाबत राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधून माहिती देणार असल्याचे समजते.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने तर्क-वितर्क
मुंबईत पावसामुळे झालेली पूरस्थिती, पाऊस आणि मिठी नदीसह विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांचे विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे सांगितले जात असले, तरी बेस्ट निवडणुकीत मनसेसह ठाकरे बंधूंच्या युतीचा दारुण पराभव झाल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरदार सुरू आहे. यातच बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड अपयशी ठरल्यानंतर ठाकरे बंधूंच्या आगामी मुंबई महानगपालिकेतील युतीबाबत आणखी संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातच राज ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.