Join us

'मी वारंवार हेच सांगतोय'; बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 16:14 IST

राज ठाकरे यांनी एसटी संपाबाबत आपली भूमिक स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौरादरम्यान राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी एसटी संपासह, परीक्षा रद्दचे प्रकरण, एमआयएम पक्षाने काढलेली तिरंगा रॅली, रजा अकादमी दंगल, ओबीसी आरक्षण, सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेला मृत्यू, राहुल गांधींचे विधान यांसारख्या अनेकविध विषयांवर यावेळी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

राज ठाकरे यांनी एसटी संपाबाबत आपली भूमिक स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी संपावर अधिकृतपणे बोलायला हवे. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही, असं मत राज ठाकरे यांनी यावेळी मांडलं.

राज ठाकरेंनी देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबतही मत व्यक्त केलं आहे. बिपीन रावत यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसेच हा अपघात होता की घातपात होता यावर संशय घेतला जात आहे. मात्र, हा घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का? असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तसेच या देशात अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे मिळतच नाही, हेच मी वारंवार सांगतोय, असंही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. 

दरम्यान,  परीक्षा रद्द होणे तसेच परीक्षांच्या गोंधळाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोक मनावर घेत नाहीत. निवडणुकांमध्ये या सर्व गोष्टी विसरून जातात. तसेच परीक्षेचा घोळ करणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे. ज्या त्रासातून आपण गेलो, त्याची आठवण निवडणुकांमध्येही ठेवलायला हवी. केवळ सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

कोरोना नियमांबाबत सरकारमधील लोकांनाच समजत नाही- राज ठाकरे

कोरोना नियमांबाबत सरकारमधील लोकांनाच नीट समजत नाही. कोरोना नियमांमध्ये एकाला सूट आणि दुसऱ्याला नाही, असे सुरू आहे. थिएटरमध्ये मास्क लावायचा नाही. एक खुर्ची मोकळी सोडायची. मग हेच नियम रेस्टॉरंटला लागू नाहीत, असा टोला लगावत राज ठाकरे यांनी आचारसंहितेच्या नियम पालनाचा किस्सा सांगितला. १९९५ मध्ये निवडणूक आचारसंहिता आणली. तिचे नियमही लोकांना स्पष्ट माहिती नव्हते. त्यामुळे एक कॅमेरावाला माझ्या मागे लागला. तेव्हा त्याला बाथरूमला चाललोय हे सांगावे लागले, असे सांगितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

टॅग्स :राज ठाकरेबिपीन रावतमनसेभारतकेंद्र सरकार