अहमद पटेल यांचा 'तो' अनुभव मी देखील घेतला; राज ठाकरेंनी सांगितली आठवण

By मुकेश चव्हाण | Published: November 25, 2020 02:13 PM2020-11-25T14:13:09+5:302020-11-25T14:13:24+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील फेसबुकद्वारे अहमद पटेल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

MNS chief Raj Thackeray has also paid tributes to Congress leader Ahmed Patel | अहमद पटेल यांचा 'तो' अनुभव मी देखील घेतला; राज ठाकरेंनी सांगितली आठवण

अहमद पटेल यांचा 'तो' अनुभव मी देखील घेतला; राज ठाकरेंनी सांगितली आठवण

Next

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती दिली.  गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी अहमद पटेल यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. अहमद पटेल यांच्या निधानानंतर विविध स्तरावरुन श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. याचदरम्यान, मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील फेसबुकद्वारे अहमद पटेल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

राज ठाकरे म्हणाले की,  काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झालं. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते, राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते. पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली. तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरलं नाही. त्यामुळेच ह्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. 

राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत ह्याचा अनुभव मी देखील घेतला आहे.  ४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, आणि अहमद पटेल ह्यांचं निवासस्थान अनेक सत्तांतराचं केंद्रस्थान होऊन देखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणं हा गुण दुर्मिळच.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल ह्यांचं कोरोनाने निधन झालं. अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते,...

Posted by Raj Thackeray on Tuesday, 24 November 2020

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने 'चाणक्य' गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रेस मजबूत करण्यात अहमद पटेलांची महत्वाची भूमिका- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमद पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले की, त्यांनी अनेक वर्षे जनतेची सेवा केली. तल्लख बुद्धीसाठी ते ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाला मजबूत बनविण्यामध्ये त्यांची भूमिका होती, ती नेहमी लक्षात ठेवली जाईल. त्यांचा मुलगा फैजल यांच्याशी फोनवर बोललो. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो. 

प्रियांका गांधी यांचे ट्विट

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहमद पटेल बुद्धीमान आणि अनुभवी सहकारी होते. त्यांच्याकडून मी नेहमी सल्ले घेत होते. ते एक असे मित्र होते, जे शेवटपर्यंत दृढतेने, ईमानदारीने आमच्या सोबत होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे त्या म्हणाल्या आहेत. 

Web Title: MNS chief Raj Thackeray has also paid tributes to Congress leader Ahmed Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.