Join us  

मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा!

By मुकेश चव्हाण | Published: September 21, 2020 1:26 PM

राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे.

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्यापही पुढील काही काळ मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टन्स ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळेच राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. लॉकडाऊन आणि कोरोना रोगाचा प्रसार वाढ नये, यासाठी काळजी म्हणून नियमांचे कडेकोट पालन करण्याचे सरकारने बजावले आहे. मात्र असं असतानाही देखील मनसेप्रमुखराज ठाकरे अनेकवेळा मास्क परिधान न करताच प्रवास करत असल्याचे समोर आले होते. परंतु यावेळी मास्क न घातल्याचा फटका राज ठाकरेंना बसला असल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरे कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने प्रवास केला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. या सर्व प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना नियमांची माहिती दिली. यानंतर आपली चूक लक्षात येताच राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे राज ठाकरेंनी १००० रुपयांचा दंड देखील भरला, असे वृत्त 'मुंबई मिरर'ने दिले आहे.मनसेकडून स्पष्टीकरणया घटनेप्रकरणी मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'या प्रवासात मी राज ठाकरेंसोबत होतो. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं मी ठामपणे सांगू शकतो,' असे सरदेसाईंनी सांगितलं.

याआधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी राज ठाकरे यांचा अपवाद वगळता सर्वच जणांनी मास्क घातले होते. यानंतर तुम्ही फेस मास्क का लावला नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही, असं उत्तर राज यांनी हसत हसत दिलं होतं.

तत्पूर्वी, मुंबईत जमावबंदी असतानाही काही दिवसांआधी वरळीतील नागरिकांनी राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मनसे पक्षात प्रवेश करण्यासाठी वरळीतील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजाबाहेर हजेरी लावली होती. मुंबईत जमावबंदीचे आदेश असताना एकाच ठिकाणी एवढे लोक कसे जमले, याविषयी प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते.

दरम्यान, राज्यात १२ लाख ८ हजार ६४२ कोरोनाबाधित झाले असून, मृतांचा आकडा ३२ हजार ६७१ झाला आहे.  राज्यात रविवारी २६ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ८ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनेक देशांनी अनिवार्य केलेला आहे. राज्यातही मास्क न घातल्यास १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या-

"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसअलिबाग