“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 09:05 PM2020-08-04T21:05:56+5:302020-08-04T21:39:53+5:30

आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

MNS Chief Raj Thackeray Express his views about Ram Mandir Bhumipujan | “कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”

“कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं स्वप्न पूर्ण; बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते”

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागलाभारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षणशेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग

मुंबई – अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे, ५ ऑगस्ट रोजी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात राम मंदिर निर्माण भूमीपूजनाचा सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अयोध्येत भूमीपूजन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला २०० जणांना विशेष निमंत्रण दिलं आहे.

राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात अलीकडेच हिंदुत्वाच्या दिशेने राजकीय भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भावना मांडल्या आहेत. राज ठाकरे म्हणतात की, जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमीपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यवधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे. तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक कारसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या कारसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.

त्याचसोबतच ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. अर्थात ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.  सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे. तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Web Title: MNS Chief Raj Thackeray Express his views about Ram Mandir Bhumipujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.