mns chief raj thackeray announces march in support of caa nrc | मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर

मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर

मुंबई: राम मंदिर, कलम ३७० चा राग सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात रस्त्यावर उतरुन काढला जात आहे. त्यामुळेच देशभरात मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चातून उत्तर देईल, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. सीएए, एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्चांविरोधात मनसे ९ फेब्रुवारीला रस्त्यावर उतरेल, असं म्हणत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मुंबईतल्या गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते. 

जगभरातून भारतात येणाऱ्या लोकांना विमानतळावर व्हिसा विचारला जातो. मात्र पाकिस्तान, बांगलादेशातून अनधिकृतपणे देशात घुसखोरी करणाऱ्यांचं काय, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. भविष्यात युद्ध झाल्यास आपल्या सैन्याला देशातच लढावं लागेल. देशातल्या शत्रूंपासून आपल्याला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे घुसखोर बांगलादेशींना देशातून हाकलून द्यायलाच हवं. यासाठी माझा मोदी सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली. 

आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत. तशी माहिती माझ्याकडे आहे आणि या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असं राज यांनी सांगितलं. झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज बदलला नाही असं होत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं. नरेंद्र मोदी जेव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली. पण जेव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली, तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम ३७० असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कारण मी माणूसघाणा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.  

Web Title: mns chief raj thackeray announces march in support of caa nrc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.