मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपा-शिंदेसेना युतीला काठावरचं बहुमत मिळालं आणि त्यानंतर मुंबईच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. ठाकरेंच्या संपर्कात नगरसेवक असल्याचीही चर्चा आहे. याच दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी हॉटेल पॉलिटिक्सवरून जोरदार निशाणा साधला आहे.
"नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? किती खाली घसरणार महाराष्ट्राचं राजकारण?"; असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच "लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा!" असंही म्हटलं आहे. अमित ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. "
"स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास?"
"नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत.याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण?"
"जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी"
"या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा" असं अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेचा निकाल लागला. युतीला बहुमत मिळाले आणि महत्त्वाचा प्रश्न चर्चेला आला की महापौर कोणाचा होणार? भाजपाचा महापौर झाला, तर शिंदेसेनेच्या वाट्याला कोणती पदे मिळणार? या प्रश्नांभोवती चर्चेने फेर धरलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील सर्व २९ नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले. निवडणूक निकालानंतर दबावाचे राजकारण होताना पाहायला मिळत आहे.
Web Summary : Following Mumbai's election, corporators are allegedly held in hotels amid political maneuvering. Amit Thackeray criticizes this 'horse-trading,' questioning the betrayal of voters and misuse of public funds for personal gain over public service.
Web Summary : मुंबई चुनाव के बाद, राजनीतिक जोड़तोड़ के बीच पार्षदों को होटलों में रखने का आरोप है। अमित ठाकरे ने इस 'खरीद-फरोख्त' की आलोचना करते हुए मतदाताओं के विश्वासघात और जनसेवा के बजाय निजी लाभ के लिए सार्वजनिक धन के दुरुपयोग पर सवाल उठाया।