एमएमआरडीएचा सांस्कृतिक वारसा जतनासाठी पुढाकार; मुंबईचा इतिहास मांडणाऱ्या चार माहितीपुस्तिकांचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:09 IST2025-07-23T13:08:07+5:302025-07-23T13:09:28+5:30
या पुस्तिकेत ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध, पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या परिसरांची माहिती चित्रित करण्यात आली आहे.

एमएमआरडीएचा सांस्कृतिक वारसा जतनासाठी पुढाकार; मुंबईचा इतिहास मांडणाऱ्या चार माहितीपुस्तिकांचे प्रकाशन
मुंबई : मुंबई महानगराचा समृद्ध आणि अनेक पैलूंचा इतिहास मांडणाऱ्या चार माहितीपुस्तिकांचे प्रकाशन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी हस्ते करण्यात आले. यामध्ये हेत शाह व श्वेतल पाटील लिखित ‘अ वॉक थ्रू कल्याण-ठाणे’, मानसी चोक्सी व इसा शेख यांनी लिहलेले ‘अ वॉक थ्रू मुंबादेवी-डोंगरी’, मिनाझ अन्सारी लिखित अ वॉक थ्रू मुंबई सबर्ब्स : बांद्रा अँण्ड कोस्टल ट्रेल्स, तसेच पास्कल रोकलोप्स लिखित अ वॉक थ्रू वसई-सोपारा-विरार या पुस्तकांचा समावेश आहे.
या पुस्तिकेत ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध, पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या परिसरांची माहिती चित्रित करण्यात आली आहे. मुंबादेवीच्या पवित्र मंदिरांपासून ते वसई-सोपाऱ्याच्या प्राचीन व्यापारी मार्गांपर्यंतच्या भागाचा यात समावेश आहे. वारसा अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटक यांच्यासाठी ही ग्रंथमाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण मार्गदर्शक ठरणार आहे. एमएमआरडीएने २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अ वॉक थ्रू मुंबई फोर्ट’ याच्या यशानंतर ही नवी माहितीपुस्तिका तयार केली आहे.
एमएमआर हेरिटेज कमिटीच्या चर्चांमधून साकारली पुस्तिका
मुंबईचा औद्योगिक विकास आणि विस्तार होत असताना अनेक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या जागा लोकांच्या दृष्टिआड गेल्या. एमएमआर हेरिटेज कमिटीच्या सुरुवातीच्या चर्चांमधून साकार झालेल्या या माहितीपुस्तिका ग्रंथमालेच्या माध्यमातून या सांस्कृतिक ठेव्यांची जाणीव नव्याने जागृत करण्याचा आणि शहराच्या वारसाबाबतचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करताना इथला समृद्ध वारसाही लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माहितीपुस्तिकांच्या माध्यमातून नवीन पिढीला मुंबई महानगर प्रदेशाचा वारसा जवळून पाहता येईल. ही ऐतिहासिक ठिकाणे कुठे आहेत, त्यांचे पूर्वी काय महत्त्व होते आणि काळानुसार हा प्रदेश कसा बदलत गेला, हे समजण्यास मदत होईल.
-डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए