MMRDA's fire service for Mumbai metropolitan area now | मुंबई महानगर प्रदेशासाठी आता एमएमआरडीएची अग्निशमन सेवा

मुंबई महानगर प्रदेशासाठी आता एमएमआरडीएची अग्निशमन सेवा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू झाली असून, प्रत्यक्षात येथे सेवा देण्यास सुरुवात झाल्यानंतर साहजिकच मुंंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह लगतच्या परिसरातील आपत्कालीन घटनांना वेगाने आळा घालता येणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सेवेमुळे येथील उर्वरित सेवांवरील ताण कमी होत प्राधिकरणाच्या अग्निशमन सेवेला संबंधित सेवांची मदत मिळणे ही जमेची बाजू ठरेल. याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बैठकांवर जोर दिला जात आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगडसह मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी एमएमआरडीए काम पाहत आहे. येथील पायाभूत सेवा- सुविधा उभ्या करतानाच त्या अद्ययावत करण्याचे कामही प्राधिकरणाकडून केले जात आहे. एमएमआरडीएच्या मंगळवारी झालेल्या १४९व्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. प्राधिकरणाला या निर्णयाबाबत अधिक माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्याबाबत प्रस्ताव दाखल झाला होता. बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. पुढील बैठकीत पुन्हा हा विषय येईल. त्यावर सविस्तर चर्चा होईल. मुळात या अग्निशमन सेवेचा संबंधित ठिकाणांवरील महापालिकांना, नगरपरिषदांना ग्रामीण भागांना कसा फायदा होईल असे विचारले असता, याबाबतही पुढील बैठकीत निर्णय घेतले जातील किंवा चर्चा केली जाईल, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
मुळात संंबंधित ठिकाणांवरील अग्निशमन दलाशी कसा समन्वय साधायचा. किंवा एकमेकांना कशी मदत करायची; या सर्व गोष्टींवर चर्चा सुरू असली तरी स्वतंत्र ‘सेट अप’बाबत मात्र आता काहीच माहिती देता येणार नाही, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले.

यंत्रणांचे बळ वाढणार

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंंबईसारख्या महापालिकांच्या स्वत:च्या अशा अग्निशमन सेवा आहेत. याशिवाय तळोजा किंवा येथील एमआयडीसीच्याही स्वतंत्र अग्निशमन सेवा आहेत.
नवी मुंबई, ठाण्यासह लगतच्या कल्याण-डोंबिवलीसह लगतच्या परिसरात आगी लागण्यासह आपत्कालीन घटना घडतात तेव्हा मुंबई अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. याता ही यंत्रणा आणखी बळकट होईल, असा दावा केला जात आहे.

असे आहे मुंबई महानगर क्षेत्र
प्रदेशाचे क्षेत्र सुमारे ४३५५ चौरस किलोमीटर आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर, माथेरान, कर्जत, पनवेल, खोपोली, पेण, उरण व अलिबागसह लगतच्या खेड्यांचाही यात समावेश होतो.

English summary :
MMRDA's fire service for Mumbai metropolitan area now

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MMRDA's fire service for Mumbai metropolitan area now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.