एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी मिळणार घरे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:21 IST2025-04-28T17:19:30+5:302025-04-28T17:21:53+5:30
एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील रहिवाशांना सरकारने दिलासा दिला आहे

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी मिळणार घरे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत निर्णय
Elphinstone Bridge: मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यावरुन वाद सुरु आहे. स्थानिक नागरिकांनी हा पूल पाडण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
परळ येथील एल्फिन्स्टन पूल २५ एप्रिलपासून बंद करण्यात येणार होता. मात्र स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर हा पूल सोमवार पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मंत्री आशिष शेलार यांनी स्थानिक रहिवाशांचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला. "या पुलाच्या कामाला स्थानिक नागरिक विरोध केला होता. स्थानिकांच्या मनात भीती आहे पुलाचे काम करताना १७ इमारतींना धोका निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांकडून विरोध करण्यात येत होता," असे आशिष शेलार यांनी सांगितले.
त्यानंतर आता एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींमधील रहिवाशांना सरकारने दिलासा दिला आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या कामात एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या. पण सरकारने नवीन नियोजन केल्याने केवळ दोन इमारती बाधित होणार आहेत. या सर्व १९ इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही विकासकाची वाट न पाहता ३३(९) अंतर्गत एमएमआरडीए नेच करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आहे.
तसेच ज्या दोन इमारतीमधील रहिवाशांची घरे बाधित होणार आहेत त्यांना कुर्ला येथे घरं अथवा मोबदला देण्याऐवजी त्याच ठिकाणी पुनर्विकासात घरे देण्यात यावीत, अशीही मागणी शेलार यांनी केली. त्यानंतर आता दोन इमारतीमधील रहिवाशांना कुर्ला येथील संक्रमण शिबिरात तात्पुरती घरे देण्यात येणार आहे. तसेच १७ इमारतींचा पुनर्विकास करताना बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांना त्याच ठिकाणीच घरे देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
"गिरणगावातील मराठी माणसाला त्याच ठिकाणी घरे मिळायला हवीत ही भाजप आमदार कालिदास कोळबंकर यांच्यासह आमची भूमिका आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या गिरणगावातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे," असेही आशिष शेलार म्हणाले.