Join us

एमएमआरडीए, महापालिका यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे गतिमान करावीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 13:55 IST

MMRDA and BMC : एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा

मुंबई : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह विविध विकासकामांसोबत मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे, नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. एमएमआरडीए, महापालिका आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करावीत, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, संजीव जयस्वाल, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर उपस्थित होते. आदित्य यांनी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला.

मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे तसेच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. नदीच्या सभोवताली वॉकवे तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याची सुसाध्यता बघून माहिती सादर करावी, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंकरोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहिम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन – संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :एमएमआरडीएमुंबई महानगरपालिकामुंबईआदित्य ठाकरे