एमएमआरसीएल भाड्याने देणार दोन मेट्रो स्थानकांवरील अतिरिक्त जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 03:53 AM2020-01-14T03:53:55+5:302020-01-14T03:54:08+5:30

मेट्रो-३ मार्गिका : मुंबई मेट्रोला मिळणार दरमहा कोट्यवधींचा महसूल

 MMRCL will rent extra space on two metro stations | एमएमआरसीएल भाड्याने देणार दोन मेट्रो स्थानकांवरील अतिरिक्त जागा

एमएमआरसीएल भाड्याने देणार दोन मेट्रो स्थानकांवरील अतिरिक्त जागा

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे काम करत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) महसूल मिळवण्याच्या दृष्टीने योजना आखण्यास सुरुवात केली आहे. एमएमआरसीएलने मेट्रो-३ मार्गिकेच्या स्थानकांवरील काही मोकळ्या जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरसीएलने मेट्रो-३ मार्गिकेवरील कफ परेड आणि सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाच्या परिसरातील मोकळ्या जागा भाड्यावर देण्याची तयारी केली असून, या दोन स्थानकांपासून दरमहा एमएमआरसीएलला चार ते पाच कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मेट्रो-३ मार्गिकेवरील कफ परेड मेट्रो स्थानकावरील ७८०० चौरस मीटर आणि सिद्धिविनायक मेट्रो स्थानकांवरील २९७९ चौरस मीटर अशी एकूण १० हजार ७७९ चौरस मीटरची जागा भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरसीएलमार्फत खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

तज्ज्ञांच्या मतानुसार कफ परेड आणि प्रभादेवी परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध नाही. तसेच ही ठिकाणे मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाची असल्याने व्यवसायासाठी उत्तम जागा असेल. यामुळे कंपन्यांकडून अथवा संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे कफ परेड मेट्रो स्थानकाच्या ७८०० चौरस मीटर जागेपासून एमएमआरसीएलला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, तर सिद्धिविनायक मेट्रो स्थानकातील २९७९ चौरस मीटरची मोकळी जागा भाड्याने देऊन साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होऊ शकतो.

मेट्रो तिकीट केंद्रांच्या जवळच जागा!
प्रवाशांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्यावर मेट्रो स्थानकांच्या परिसरामध्ये जी अतिरिक्त जागा शिल्लक राहते ही अतिरिक्त जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागा मेट्रो तिकीट केंद्रांच्या जवळच आहेत. मेट्रो-३ मार्गिका सुरू झाल्यावर सिद्धिविनायक आणि कफ परेड मेट्रो स्थानकातून दररोज सुमारे ५० हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतील. या दोन्ही स्थानकांच्या कामाला वेग आला आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचे काम आतापर्यंत ५१ टक्के पूर्ण झाले आहे, तर कफ परेड स्थानकाचे काम आतापर्यंत ५५ टक्के पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच एमएमआरसीएलने मेट्रो स्थानकांची नावे देण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. या माध्यमातून एमएमआरसीएलला कोट्यवधींचा महसूल मिळणार आहे.

Web Title:  MMRCL will rent extra space on two metro stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो