मी 'विरोधी' म्हणून मला बोलावले नाही : वरुण सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:54 IST2025-08-14T11:53:49+5:302025-08-14T11:54:04+5:30
वांद्रे पूर्वचे आमदार सरदेसाई यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत ही नाराजी व्यक्त केली

मी 'विरोधी' म्हणून मला बोलावले नाही : वरुण सरदेसाई
मुंबई: 'केवळ विरोधी पक्षात आहे, म्हणून स्थानिक आमदाराचे नाव उड्डाणपुलाच्या उद्घाटन निमंत्रण पत्रिकेवर न छापणे हे राजशिष्टाचाराच्या विरोधात आहे,' अशा शब्दांत उद्धवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाबाबत (एमएमआरडीए) नाराजी व्यक्त केली.
वांद्रे पूर्वचे आमदार सरदेसाई यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत ही नाराजी व्यक्त केली. कलानगर पूल आणि सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तारित मार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन होणार आहे, मात्र या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून नाव टाकले नाही, याची दाखल एमएमआरडीए आयुक्तांनी घावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दोन्ही पूल तब्बल तीन महिन्यांपासून पूर्ण तयार असून केवळ उद्घाटन झाले नाही म्हणून लोकांना वापरता येत नव्हते. पावसाळ्यात लोकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. मी एमएमआरडीए आयुक्तांना भेटून मे महिन्यामध्ये लोकार्पण करण्याची विनंती केली होती, अशी आठवण देखील आमदार सरदेसाई यांनी करून दिली आहे.
दरम्यान, आता दोन्ही पूल खुले होत असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.