Join us  

आमदार कडू-राणांमध्ये पुन्हा जुंपली; थेट अमेरिकेच्या 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्याशीच तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 6:25 PM

अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य हे दोघेही महायुतीचा घटक पक्ष आहेत.

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांना भाजपाने तिकीट जाहीर केल्यापासून स्थानिक नेत्यांनी राणा दाम्पत्याच्या उमेदवारीस थेट विरोध केला आहे. तर, प्रहार संघटनेचे संस्थापक आणि आमदारबच्चू कडू यांनी तर प्रहारचा उमेदवारही अमरावतीत नवनीत राणांविरुद्ध लोकसभेच्या मैदानात उतरवला आहे. त्यामुळे, आमदार कडू आणि राणा यांच्यातील वाद आता मतदारसंघातसह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच, आता आमदार रवि राणा यांनी बच्चू कडूंची तुलना थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांसोबतच केली. त्यामुळे, आमदार कडू आणि राणा यांच्यात पुन्हा जुंपली आहे. 

अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य हे दोघेही महायुतीचा घटक पक्ष आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वीही उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीने दोघांमधील वाद मिटविण्यात आला होता. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरुद्ध प्रचारालाही सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने, काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून कडू यांनी राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली. आता, कडू यांच्या टीकेवर आमदार रवि राणा यांना पलटवार केला आहे.  

प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. २ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची, असा टोलाही राणा दाम्पत्याला लगावला. १७ रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, १७ रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी लोकांना जागरुक करत राणा दाम्पत्यावर प्रहार केला. त्यानंतर, आता आमदार रवि राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

"शेतकऱ्यांसाठी मी चार ते पाच वेळा तुरुंगात गेलो आहे. अन्नत्याग केला आहे. कोणतंही सरकार असूद्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढलो आहे. पण, काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात आले आहेत. बोलणं फार सोपं आहे. ते आता आंतरराष्ट्रीय नेते झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झाल्यामुळे ते फार बोलू शकतात.", अशा शब्दात राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलनाही केली. ''डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या जागी बच्चू कडूंना बसवलं पाहिजे. ते अमेरिकेतून देशावर लक्ष ठेवतील आणि देशाचं भलं होईल, अशी बोचरी टीका राणा यांनी केली.  

बच्चू कडूंनी स्वत:च्या खिशात हात टाकून बघावं

दरम्यान, वेळ आल्यावर बच्चू कडूंना योग्य उत्तर देणार. मी किराणा वाटतो, त्यावरही टीका होते. स्वत: खिशात कधी हात टाकून बघा,'' अशा शब्दात रवि राणा यांनी बच्चू कडूंवर पलटवार केला आहे. 

राणांविरुद्ध प्रहारकडून दिनेश बूब मैदानात

प्रहारचे लोकसभा उमेदवार दिनेश बूब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते. आता बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. तसेच, या जागेवर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हेदेखील इच्छुक होते. पण, ही जागा भाजपने शिवसेनेकडून काढून घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळ देखील पक्षावर आणि राणांवर नाराज आहेत.  

टॅग्स :बच्चू कडूअमरावतीरवी राणाआमदारनवनीत कौर राणालोकसभा निवडणूक २०२४