मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र ही नियुक्ती लगेच होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एप्रिलमधील निवडणुकांनंतर होईल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले. मात्र, मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूलमंत्रिपद मिळाले त्याचवेळी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार हे स्पष्ट झाले.
शिर्डी अधिवेशनात घोषणा होणार का?
भाजपचे प्रदेश अधिवेशन १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे. तेथे चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे.
चव्हाण यांना आताच प्रदेशाध्यक्ष केले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळेल, असे म्हटले जात आहे.
मंत्रिपद मिळालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत प्रदेशाध्यक्षपदीदेखील ठेवावे असाही एक प्रवाह आहे.
संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न
बावनकुळे व चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत. फडणवीस काय ठरवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. तसेच दिल्लीतील भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेते तेही तितकेच महत्त्वाचे असेल. रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे, तर बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत.
बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चौथे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आता चव्हाण यांच्या रूपाने मराठा समाजाला प्रदेशाध्यक्षपद देऊन संतुलन साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोकणात भाजपला मोठे यश मिळवून देण्यात चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.