कांदा उत्पादकाच्या मुलीला आ. नार्वेकर यांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:28 IST2025-05-27T10:27:18+5:302025-05-27T10:28:08+5:30
विधान परिषदेतील आ. मिलिंद नार्वेकर यांनी एक लाख रुपयांची मदत केली आहे.

कांदा उत्पादकाच्या मुलीला आ. नार्वेकर यांची मदत
मुंबई : अवकाळी पावसामुळे संकट ओढवलेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी महेश दरेकर यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी उद्धवसेनेचे विधान परिषदेतील आ. मिलिंद नार्वेकर यांनी एक लाख रुपयांची मदत केली आहे.
आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश दरेकर यांनी ९० हजार रुपये खर्चुन तीन एकर जमिनीवर कांद्याची लागवड केली होती. आलेल्या पिकातून काही पैसे मिळून पहिलीच्या वर्गात शिकणारी मुलगी प्रगतीची फी भरू, तिच्यासाठी वह्या-पुस्तके आणण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतात विक्रीसाठी काढून ठेवलेला कांदा भिजून गेल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले. मुलगी प्रगती हिने झालेल्या नुकसानीमुळे वडिलांना खाऊ, पुस्तके घेता येणार नाहीत, अशी खंत व्यक्त केली होती. तिची ती व्यथा ऐकून आ. नार्वेकर यांनी दरेकर यांच्याशी संपर्क साधून प्रगतीला तत्काळ एक लाख रुपयांची मदत केली.