Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण..."; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:50 IST

राज ठाकरे यांनी पूर्ण विश्वासाने तुम्हाला तिकीट दिले होते मात्र तुम्ही तेव्हा कुणासोबत सेटलमेंट केली हे त्यांना विचारा असं सावंत यांनी म्हटलं.

मुंबई - महापालिकाच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी धुरी यांनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर झाला असा आरोप केला. मात्र धुरी यांच्या आरोपावरून आता उद्धवसेनेचे दादर-माहिम भागातील आमदार महेश सावंत यांनी धक्कादायक दावा केला आहे. संतोष धुरी यांना मनसेने आणि राज ठाकरेंनी नावारुपाला आणले. राज ठाकरेंनी त्यांना नगरसेवक बनवले, त्याआधी संतोष धुरी यांना कुणीही ओळखत नव्हते अशी टीका आमदार महेश सावंत यांनी केली.

आमदार महेश सावंत म्हणाले की, संतोष धुरी हे भरकटलेले आहेत त्यामुळे काहीही आरोप करायचा आणि पक्ष सोडायचा हा त्यांचा धंदा आहे. राज ठाकरे यांचे त्यांच्यावर फार उपकार आहेत. दिल्या घरी सुखी राहा. त्याचा राजकारणाशी ५ पैशाचा गंध नव्हता. २०१२ साली आमच्या दोन शिवसैनिकांमध्ये मतविभागणी झाली आणि अवघ्या २०० मतांनी धुरी निवडून आला. त्याला या विभागात कुणी ओळखत नव्हते. राज ठाकरेंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला म्हणून ते नगरसेवक झाले. २०१७ साली त्याने काय केले विचारा, मी अपक्ष उभा राहून मला ८५०० मते मिळाली आणि संतोष धुरी यांना साडे पाच हजार मते पडली. त्यावेळी कुणासोबत साटेलोटे करून त्यांनी निवडणुकीतून अंग बाहेर काढले होते ते त्यांना विचारा असा आरोप त्यांनी केला.

तसेच राज ठाकरे यांनी पूर्ण विश्वासाने तुम्हाला तिकीट दिले होते मात्र तुम्ही तेव्हा कुणासोबत सेटलमेंट केली हे त्यांना विचारा. त्यानंतर लगेच आदर्श नगरमध्ये खोली घेतली, दुकाने घेतली हा पैसा कुठून आला? मी डायरेक्ट राजसाहेबांना बोललो, याला तिकीट देऊ नका. हा पुन्हा सेटलमेंट करेल आणि आपली सीट पाडून टाकेल. एखाद्याला पैशांची चटक लागली तर त्याला पक्षाशी एकनिष्ठता वैगेरे काही नसते. आमच्याकडे काही नसताना माजी आमदार सरवणकर यांच्याविरोधात लढलो. आमच्याकडे जिद्द होती. लोकांचे पाठबळ होते असंही आमदार महेश सावंत यांनी म्हटलं.

दरम्यान, संतोष धुरी कुठे निवडून आले असते, २०१७ साली ते पडले होते. त्यामुळे धुरी यांनी बडबड करू नये. त्यांचा आमच्या येथील वार्डाशी काय संबंध नाही. तो वरळीला असायचा. वार्डात काम करत असेल तर कोणती बिल्डिंग कुठे आहे ते सांगावे. लोकांची कामे केली नाहीत त्याने माझ्या समोरासमोर बसून सांगावे. संतोष धुरीला तिकीट द्यायला माझा विरोध होताच. संतोष धुरी फक्त नावाला नगरसेवक होते. त्यांनी ५ वर्षात काय कमावले आणि कुठल्या कुठल्या बिल्डरकडून घेतले त्याची यादी आमच्याकडेही आहे. त्याने ५ वर्षात विभागात काय काम केले, कुठल्या लोकांची कामे केली हे सांगावे असं आमदार महेश सावंत यांनी विचारले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sawant: I told Raj Thackeray, don't give him ticket!

Web Summary : MLA Mahesh Sawant alleges Santosh Dhuri, who joined BJP, betrayed MNS. Sawant opposed Dhuri's ticket due to expected 'settlement' and seat loss. Dhuri's wealth questioned.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६राज ठाकरेभाजपामनसे