ग्रामीण भागातील आमदारांनी जमविली गर्दी, सभेत बाळासाहेबांची खुर्ची, एकनाथ शिंदेंनी केली पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 06:16 AM2023-10-25T06:16:49+5:302023-10-25T06:17:19+5:30

या मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

mla from rural areas gathered a crowd for shiv sena shinde group dasara melava | ग्रामीण भागातील आमदारांनी जमविली गर्दी, सभेत बाळासाहेबांची खुर्ची, एकनाथ शिंदेंनी केली पूजा

ग्रामीण भागातील आमदारांनी जमविली गर्दी, सभेत बाळासाहेबांची खुर्ची, एकनाथ शिंदेंनी केली पूजा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:एकनाथ शिंदे गटाचा मागील दसरा मेळावा बीकेसीला पार पडला होता. या मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. मेळाव्याला ग्रामीण भागातील गर्दी जास्त दिसत होती. ग्रामीण भागातील आमदारांनी ही गर्दी जमवली होती. 

प्रत्येक आमदारावर मतदारसंघातून गर्दी जमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी आमदारांनी मतदारसंघात खाजगी बस, तसेच एसटी बसही बुक केल्या होत्या. त्यातही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील बस आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने दिसत होत्या.

ठाण्यातील शेवटच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली खुर्ची व्यासपीठावर मध्यभागी ठेवण्यात आली होती. या खुर्चीवर भगव्या रंगाची शाल टाकण्यात आली होती. व्यासपीठावर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या खुर्चीची पूजा केली.

बाळासाहेबांचा मोठा फोटो

व्यासपीठावर मागे लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा मोठा फोटो लावण्यात आला होता, तसेच अयोध्येतील राममंदिराचा फोटो छापण्यात आला होता, तर व्यासपीठाच्या समोर दोन्ही बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे मोठे कटआउट लावण्यात आले होते.

सभेला झेंड्यांची गर्दी

- आझाद मैदान परिसर, तसेच दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवर धनुष्यबाण चिन्ह असलेले भगवे झेंडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. आझाद मैदानावरही झेंड्यांची संख्या खूप होती.

- शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटले की, घोषणाबाजी, जयजयकार आणि उत्साह असतो. आझाद मैदानावर मात्र तुलनेने कमी उत्साह जाणवत होता. 

- मेळाव्यात नंदेश उमप, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि मनीष राजगिरी या गायकांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात 
आला होता. यावेळी शिवसेना गीतही गाण्यात आले.

 

Web Title: mla from rural areas gathered a crowd for shiv sena shinde group dasara melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.