Join us  

मिटकरी म्हणतात... महाविकास आघाडीच्या दणक्यामुळेच पेट्रोल-डिझेल स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 10:28 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारने आमच्या दणक्यामुळेच घेतल्याचे मिटकरी यांनी ट्विट केलंय

ठळक मुद्देकाँग्रेस नेते आणि प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या पेट्रोल दरकपातीच्या निर्णयाला जुमला म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी झाले आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतरही विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर, राष्ट्रवादीने हे आम्ही केलेल्या विरोधामुळेच झाल्याचं म्हटलं आहे.  

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारने आमच्या दणक्यामुळेच घेतल्याचे मिटकरी यांनी ट्विट केलंय. महाविकास आघाडीच्या दणक्यामुळेच पेट्रोल-डिझलेचा दरात कपात झाली. 'मविआच्या दणक्याने केंद्राला अखेर जाग, मविआ सरकारच्या एकजुटीचा विजय असो', असे ट्विट आमदार मिटकरी यांनी केलं आहे. 

काँग्रेस नेते आणि प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या पेट्रोल दरकपातीच्या निर्णयाला जुमला म्हटलं आहे. तसेच, काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर असलेल्या उत्पादन शुल्काची आणि मोदी सरकारच्या काळातील उत्पादनक शुल्काची आकडेवारीच जाहीर केली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील उत्पादन शुल्क पाहिल्या सध्याचे उत्पादन शुल्क पेट्रोलवर तिप्पट अधिक असल्याचे दिसून येते. तर, डिझेलवरही उत्पादन शुल्क 7 पटीने अधिक असल्याचे दिसून येते. त्यावरुनच, सुरजेवाला यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ये जुमलेबाजी नही चलेगी, असं त्यांनी म्हटलंय.   

दरम्यान, लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांतून अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा करिश्मा कायम दिसला. तर, जिथे ते नाहीत, तिथेच भाजप व काँग्रेस यांच्यात सामना झाला आणि काही प्रमाणात काँग्रेसला यश मिळू शकले, असेही स्पष्ट झाले. एकंदरीत पोटनिवडणुकीत भाजपची चांगलची पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील वाढती महागाई, इंधन दरवाढ यास जनता कंटाळल्यामुळे भाजपला पराभवाचा फटका बसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. त्यानंतर, आज पोटनिवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्याचदिवशी केंद्र सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिलंय.

स्वाती मालीवाल यांनी लगावला टोला

मोदी सरकारने उत्पादन शुक्लात कपात केल्यामुळे पेट्रोल 5 आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, हा पोटनिवडणूक निकालांचा परिणाम असल्याची खोचक टीका दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केली आहे. स्वाती यांनी ट्विट करुन, जनतेनं मोदी सरकारला दिलेल्या रिटर्न गिफ्टचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :आमदारपेट्रोलराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीमहाविकास आघाडी