मिठी नदी गाळ भ्रष्टाचार चौकशीच्या व्याप्तीत वाढ; उद्योगमंत्री उदय सामंत; २००६ पासूनची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:03 IST2025-07-18T10:02:53+5:302025-07-18T10:03:05+5:30
प्रसाद लाड यांनी मिठी नदी गाळ उपसाबाबत तारांकित प्रश्न विचारला. गाळ उपसात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून हा १२०० कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे.

मिठी नदी गाळ भ्रष्टाचार चौकशीच्या व्याप्तीत वाढ; उद्योगमंत्री उदय सामंत; २००६ पासूनची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. २०१२ ते २०२१ या काळातील तीन लाखांहून अधिक फोटो एसआयटीने तपासले असून काही आरोपींना अटक केली आहे. मात्र, या चौकशीची व्याप्ती वाढवून २००६ वर्षांपासूनची चौकशी सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
प्रसाद लाड यांनी मिठी नदी गाळ उपसाबाबत तारांकित प्रश्न विचारला. गाळ उपसात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून हा १२०० कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. दीड दशकांहून अधिक काळ हा घोटाळा सुरू असून यात काही नेते गुंतले आहेत, असा आरोप केला.
आयोग नेमून चौकशी करा - अनिल परब
मिठी नदीचा प्रश्न तीन वेळा विचारला. त्याला मंत्र्यांनी उत्तर दिले. एसआयटी चौकशी केली. ईडीही पुढे आली. त्यामुळे आता निवृत्त न्यायाधीशांची एसआयटी नेमा. एखादा आयोग नेमा. चौकशीचा फेरा वाढवून २००५ पासून करा. या विषयावर एकदा सविस्तर चर्चा घडवून आणा. कुणाची तरी बदनामी करण्यासाठी हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे, अशी टीका उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली.
६५ कोटींचा गैरव्यवहार
मंत्री सामंत यांनी उत्तर देताना गेल्या तीन वर्षांत ६५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याचे सांगितले. चौकशीत अनेक ठिकाणी काम न झाल्याचे किंवा चुकीचे काम झाल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ठेकेदारांची यादी सरकारकडे आहे.