Join us

मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 07:16 IST

दुपारी दीड वाजेपर्यंत मिठी नदीच्या परिसरात गर्दी कायम होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तीन दिवसांपासून पडणाऱ्या जोरधारांमुळे मिठी नदी मंगळवारी सकाळीच धोक्याच्या पातळी जवळून वाहू लागली. त्यामुळे नदीच्या परिसरात कुर्ला पश्चिमेकडे क्रांतीनगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांसोबत उर्वरित यंत्रणांनी जवळच्या पालिकेच्या शाळेत हलविण्यास सुरुवात केली. दुपारी दीड वाजेपर्यंत मिठी नदीच्या परिसरात गर्दी कायम होती.

बघ्यांची गर्दी, डोक्याला ताप

मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि मुंबई पोलिस घटनास्थळी तैनात असतानाच मिठी नदीची वाढलेली पातळी पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याचा पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना त्रास होत होता. या लोकांना नियंत्रित करणे यंत्रणेला अवघड जात होते. दुपारी साडेबारा वाजतापर्यंत नदीच्या किनारी झालेली गर्दी कमी होण्याचे नाव घेत नव्हती.

मुसळधारमुळे अडथळे

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोर आणखी पकडला आहे. सोमवारी सकाळी मोठा धुवाधार सरी पडू लागल्यानंतर मिठी नदीच्या काठी राहणाऱ्या क्रांतीनगरमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविणे अपेक्षित होते; परंतु मंगळवारी सकाळी नदीच्या पुराने धोक्याची पातळी गाठण्यास सुरुवात केली, तेव्हा मुंबई महापालिकेने येथील रहिवाशांना लगतच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यास सुरुवात केली; मात्र जोरात पडणारा पाऊस आणि पाण्याची वाढणारी पातळी यामुळे सुरक्षेच्या कामात अडथळे येत होते.

टॅग्स :मुंबईचा पाऊसनदीपूर