मुंबईत ३ वर्षांच्या मुलीला महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून पळवलं; पोलिसांनी तीन तासांत घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:38 IST2025-01-31T06:38:36+5:302025-01-31T06:38:50+5:30
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची नेमणूक करत तपास सुरू केला होता.

मुंबईत ३ वर्षांच्या मुलीला महिलेनं चॉकलेटचं आमिष दाखवून पळवलं; पोलिसांनी तीन तासांत घेतला शोध
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीला एका महिलेनं चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची घटना वरळीत घडली. वरळी पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण प्रेमनगर झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. चिमुकलीचा शोध सुरू असताना एका घराबाहेरील सीसीटीव्हीत संशयित व्यक्ती कैद झाली. त्याआधारे वरळी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपी महिलेचा शोध घेत तिला अटक केली. मुलगी पुन्हा कुशीत आल्याने आईनेही सुटकेचा नि:श्वास टाकला.
दीपाली बबलू दास (वय ४०) असे आरोपीचे नाव असून, ती पश्चिम बंगालची रहिवासी आहे. ती आया म्हणून नोकरी करत असून, प्रेमनगरमध्येच राहते. प्रेमनगरमध्येच चिमुकली कुटुंबियांसोबत राहते. घराबाहेर खेळत असताना दासने तिला चॉकलेटचे
आमिष दाखवत सोबत नेले. ही बाब शेजारी राहणाऱ्या मुलीकडून आईला समजताच त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, मुलगी न सापडल्याने सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची नेमणूक करत तपास सुरू केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल रुपवते, महिला पोलिस उपनिरीक्षक उषा मस्कर यांच्या पथकाने सीसीटीव्हीचा शोध सुरु केला.
पोलिसांकडून प्रत्येक घराची झाडाझडती
पोलिसांनी प्रेमनगर झोपडपट्टीच्या प्रत्येक घराची झाडाझडती सुरू केली. दरम्यान, एका मुलीकडून एक संशयित महिला डोंगराळ भागात गेल्याचे समजताच पथकाने तेथे मोर्चा वळवला. गंगाराम लॉन्ड्री गल्ली येथील किराणा दुकानाजवळील सीसीटीव्हीत ती मुलीला चॉकलेट घेण्यासाठी थांबल्याचे समजले. त्याच फुटेजच्या आधारे त्यांनी शोध सुरु केला. अखेर, येथील एका घरात दास पोलिसांच्या हाती लागली.
नातीची आठवण आली म्हणून ...
दास एकटीच राहत होती. तिच्या म्हणण्यानुसार, अपहरण केलेल्या मुलीच्या वयाचीच तिची नात असून, ती पश्चिम बंगालमध्ये राहते.
मात्र, तिची भेट होत नसल्याने या मुलीला पाहून नातीची आठवण आली. तिच्यासोबत वेळ घालविण्यासाठी मुलीला सोबत घेऊन आल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिक खातरजमा करण्यात येत आहे. दासचे लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीशी काही कनेक्शन आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहेत.