धक्कादायक! महामुंबई मेट्रोत तब्बल चार कोटींचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 05:51 AM2024-06-22T05:51:50+5:302024-06-22T05:52:37+5:30

या प्रकरणात दरमहा १० लाख रुपये ते १५ लाख रुपये कंत्राटदाराला अधिक प्रमाणात दिली जात असल्याचे समोर आले.

Misappropriation of as much as four crores in Mahamumbai Metro | धक्कादायक! महामुंबई मेट्रोत तब्बल चार कोटींचा गैरव्यवहार

धक्कादायक! महामुंबई मेट्रोत तब्बल चार कोटींचा गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महामुंबईमेट्रो संचलन मंडळात अतिरिक्त मनुष्यबळ पुरविल्याचे दर्शवून पैसे लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. कंत्राटदाराने पुरविलेल्या मनुष्यबळापेक्षा १० टक्के मनुष्यबळ अतिरिक्त दाखवून कंत्राटदाराला फायदा पोहोचविला.  या काळात ३ कोटी रुपये ते ४ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी महामुंबई मेट्रोतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिका एप्रिल २०२२ पासून प्रवासी सेवेत दाखल झाल्या. या मेट्रो मार्गिकांच्या संचलनासाठी महामुंबई मेट्रोने डी. एस. एंटरप्रायजेस या संस्थेस सुमारे ५०० इतके मनुष्यबळ पुरविण्याबाबतचे कंत्राट दिले होते; मात्र या कंपनीकडून १० टक्के कमी मनुष्यबळाचा  पुरवठा केला जात होता. कंत्राटदाराकडून ५० कर्मचाऱ्यांचा कमी पुरवठा करण्यात आला होता; मात्र कमी मनुष्यबळ पुरवूनही महामुंबई मेट्रोतील मानव संसाधन विभागाकडून कंत्राटदाराला १०० टक्के मोबदला दिला जात होता. मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट ऑपरेशन विभागाकडून देण्यात आले असले, तरी कंत्राटदाराची बिले एचआर विभागाकडून अदा केली जात होती. त्यातून या प्रकरणात दरमहा १० लाख रुपये ते १५ लाख रुपये कंत्राटदाराला अधिक प्रमाणात दिली जात असल्याचे समोर आले.

याप्रकरणी गैरव्यवहार सुरू असल्याची चाहूल लागताच ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकरणाची चौकशी करण्याबाबत महामुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल यांना पत्र लिहिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता प्राथमिक तपासात या प्रकरणात तथ्य आढळून आले. 

‘एमएमआरडीए’वर कर्जाचा डोंगर 
मेट्रो मार्गिकेच्या उभारण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून कर्ज काढून मोठा खर्च केला जात आहे. सध्या प्रवासी संख्या कमी असल्याने मेट्रो मार्गिका चालविण्याचा खर्च निघणे मुश्कील आहे. त्यामुळे मेट्रो चालविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ला अर्थसंकल्पात तरतूद करावी लागत आहे. त्यातच कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार केला जात असल्याने प्राधिकरणाला नुकसालाला सामोरे जावे लागत आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.

Web Title: Misappropriation of as much as four crores in Mahamumbai Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.