अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन, एकाला अटक : पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 03:23 IST2017-08-29T03:23:19+5:302017-08-29T03:23:44+5:30
तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करत, तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन, एकाला अटक : पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई : तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करत, तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम चीलका उर्फ डीजे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तेरा वर्षांची पीडित मुलगी सीमा (नावात बदल), ही शुक्रवारी तिच्या मैत्रिणीसोबत कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरातून निघाली होती. त्या वेळी सलीमने तिला आणि तिच्या मैत्रिणीला गोड बोलून, स्वत:सोबत एका रूममध्ये नेले. जिथे दरवाजा बंद करून सीमा आणि तिच्या मैत्रिणीला धमकाविले. त्यानंतर, खोलीत अंधार करून सीमासोबत अश्लील वर्तन केले, असे तिने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर अपहरण व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. ‘सलीम हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्यावर कांदिवलीसह चारकोप पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पोलीस कोठडीत असून, त्याची चौकशी सुरू आहे,’ अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.