मंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 02:47 IST2020-09-29T02:47:16+5:302020-09-29T02:47:27+5:30
लोकांनी काळजी घेण्याचे केले भावनिक आवाहन

मंत्री वर्षा गायकवाड, आमदार अबू आझमी कोरोनामुक्त
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून, सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, तर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमीही कोरोनातून बरे झाले आहे. आझमी यांनी दोन आठवडे घरी राहूनच उपचार घेतले.
वर्षा गायकवाड या मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमानिमित्ताने दोन आठवड्यांपूर्वी नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान, त्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या. २१ सप्टेंबरला त्यांना ताप आल्यामुळे कोविडची टेस्ट केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर, त्यांनी ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल होऊन औषधोपचार घेतले. सोमवारी त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन, यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले, तर अबू आझमी यांनी दोन आठवडे घरीच उपचार घेतले. डॉक्टरांचे उपचार आणि लोकांच्या सदिच्छांमुळे बरा झालो. कोरोनावर प्रतिबंधात्मक औषधे नसल्याने लोकांची काळजी घ्यावी, असे भावनिक आवाहन आझमी यांनी केले.