Join us

"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:29 IST

मंत्री संजय शिरसाट यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.

Sanjay Shirsat on Viral Video:  आयकर विभागाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावलेली असतानाच आणखी खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ समोर आणल्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांची बेडरूम दिसत असून, त्याठिकाणी एक मोठी बॅग ठेवलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बॅग पैशांनी भरलेली आहे. दुसरीकडे विधानभवनात बोलताना संजय शिरसाट यांनी या व्हिडीओवर स्पष्टीकरण देत ती कपड्यांची बॅग असल्याचे म्हटलं.

मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मंत्री संजय शिरसाट असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या व्हिडीओवरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. मात्र आता संजय शिरसाट यांनी ती बॅग कपड्यांची होती असं स्पष्टीकरण दिलं आहे. मला या व्हिडिओ बद्दल काही आश्चर्य वाटत नाही, जाणून बुजून मला टार्गेट केलं जात आहे, असंही शिरसाट यांनी म्हटलं.

"व्हिडिओमध्ये माझं घर आहे. बेडरूममध्ये मी बनियन वर बसलेलो आहे आणि एक बॅग तिथे ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठून तरी प्रवासातून आलो आहे. अरे मूर्खांनो एवढी मोठी पैशांची बॅग जर ठेवायची असती तर कपाटं काय मेली आहेत का? नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात ठेवली असती ना. परंतु यांना कपड्याची बॅगसुद्धा नोटांची बॅग दिसत आहे. यांना पैशांशिवाय दुसरं काही दिसत नाही," असं संजय शिरसाट म्हणाले.

जाणून बुजून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न - संजय शिरसाट

"प्रवासातून आल्यानंतर ती बॅक कुठे तरी ठेवली होती. आमच्याकडे मातोश्री एक आणि मातोश्री दोन नाही. माझं घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसासाठी खुलं असतं. कोणीतरी व्हिडिओ काढला असेल. मी कार्यकर्त्यांसाठी आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहा त्याच भूमिकेत आम्ही आजही आहोत.. म्हणून कोणीतरी व्हिडिओ काढला असेल आणि तो व्हायरल झाला. त्यात गैर काहीच नाही. महिलांवर छळ करणारे आमच्या बॅगा काय पाहतात. मला या व्हिडिओ बद्दल काही आश्चर्य वाटत नाही. जाणून बुजून मला टार्गेट करत आहेत. माझा त्याच्यावर काही परिणाम होत नाही," असंही संजय शिरसाट म्हणाले.

टॅग्स :संजय शिरसाटसंजय राऊतएकनाथ शिंदे