Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर टॅक्सी’ जेट्टीसाठी प्रस्ताव तयार करा; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:32 IST

गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत सोमवारी नितेश राणे यांच्याकडे मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीला परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या वॉटर टॅक्सीचा गेट वे ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. ही वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने टर्मिनल उभारणी सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. मालवाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्याकरिता ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचनाही नितेश राणे यांनी बैठकीत दिल्या.

वाहतूककोंडी कमी होणार, वेळ वाचणार

वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, वाहतूककोंडी कमी होणार आहे. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी जोडला जाईल. वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होणार आहे.

टॅग्स :नीतेश राणे पाणी