१६ मंदिरांना गॅस सिलिंडर द्या! लोढा यांचे भुजबळ यांना पत्र; झुकते माप दिले नसल्याचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 06:28 IST2026-03-31T06:27:49+5:302026-03-31T06:28:03+5:30
१६ जैन मंदिरांना प्रत्येकी ५ गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी

१६ मंदिरांना गॅस सिलिंडर द्या! लोढा यांचे भुजबळ यांना पत्र; झुकते माप दिले नसल्याचे स्पष्टीकरण
मुंबई : राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या मलबार हिल मतदारसंघातील १६ जैन मंदिरांना प्रत्येकी ५ गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यास मदत करावी, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका पत्राद्वारे केली आहे.
चैत्र महिन्यात एकदाच येणाऱ्या ओली (आयंबील) हा जैन धर्मातील महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. यानिमित्ताने मंदिरांमध्ये अंबिल (पारंपरिक पेय) तयार करून भक्तांना वितरित केले जाते. त्यामुळे जैन मंदिरांमध्ये प्रत्येकी ५ गॅस सिलिंडरची आवश्यकता भासत असल्याने ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे.
मी झुकते माप दिलेले नाही
लोढा यांच्या या पत्रावरून वाद निर्माण झाला. त्यावर स्पष्टीकरण देताना लोढा म्हणाले, कोणत्याही विशेष समुदायाला मी झुकते माप दिलेले नाही. माझ्या विधानसभा क्षेत्रात श्रीरामनवमी, साईबाबा भंडारा या कार्यक्रमांना सहकार्य केले आहे आणि पुढेही करेन. मतदारसंघातल्या अडचणी सोडवणे हे माझे कर्तव्य आहे, आणि ते मी पार पाडणार, असे त्यांनी स्पष्ट केले.