BJP Ashish shelar on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळ्याव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या वेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या होत असलेल्या भूमिका बदलाच्या आरोपांवरही भाष्य केलं. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही यावेळी भाष्य केलं. विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय पचला नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर आता भाजपने राज ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर भाष्य करताना तुमचं नेरेटिव्ह जनतेला पटतच नाही असं म्हटलं.
पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. विधानसभा निवडणूक निकालातले अनेक असे निर्णय आहेत ज्यावर विश्वास बसतच नाही. निवडून आलेल्यांचा विश्वास नाही, पडलेल्यांचं काय घेऊन बसलोय आपण? अनेक लोक बोलतील राज ठाकरे पराभूत झाल्याने हे बोलत आहेत, मी नाही संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय. निकालानंतर सन्नाटा हे कसलं द्योतक आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं. या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं. अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा? असा सवालही राज ठाकरेंनी केला.
"भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना पुढे पक्षात घेतलं आणि त्यांना मंत्री केलं. फडणवीसांनी, किरीट सोमय्यांनी किती लोकांवर आरोप केले, ते सगळे भाजपमध्ये आले, लोक हल्ली देव पाण्यात घालून बसतात की किरीट सोमय्यांनी किंवा फडणवीसांनी आरोप केले की पक्षात घेतात, पुढे मंत्री करतात," असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. यावरुन आता माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
"श्रीमान राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात एक नरेटीव्ह स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. भाजपाने कधीच तडजोडीचे राजकारण केले नाही. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण यावरील राजकारणात आम्ही कधीच तडजोड केली नाही. यातून तुम्हाला शिकण्यासारखे काही असेल तर नक्कीच शिका. हा मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो,” असं आशिष शेलार म्हणाले.
राज ठाकरेंचे नेरेटिव्ह जनतेला पटतच नाही - आशिष शेलार
"राष्ट्र प्रथम मानून राष्ट्रवादी विचारधारेचा राष्ट्रीय पक्ष म्हणून "राष्ट्रनिर्माण" चे काम करताना... अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणात आम्ही कधीच तडजोड केली नाही. "एक देश एक निशान एक संविधान" असायला हवे म्हणून काश्मीर मधून ३७० हटवण्याच्या विषयावर आम्ही कधीच तडजोड केली नाही. काशी कॉरिडॉर, उज्जेन कॉरिडॉरच्या निर्माणात कधीच तडजोड केली नाही. अंत्योदय आणि गरिब कल्याणाच्या ज्या भूमिका आणि योजना हाती घेतल्या त्यात तडजोड केली नाही. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत कधीच तडजोड केली नाही.. होणार नाही. पोखरण असो वा एन. आर. सी, सी.ए.ए च्या विषयावर सुध्दा तडजोड केली नाही. सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए अशी बाणेदार भूमिका पण आम्ही प्रसंगी घेतली. आपल्या वैचारिक बांधिलकीशी कधीच तडजोड न करता. वेळ, काळ आणि राजकीय परिस्थिती पाहून सरकारे चालवताना जे तात्कालिक घडते, ज्याचा श्रीमान राज ठाकरे जो अर्थ लावून त्याचे सवंग निरुपण ते करु पाहत आहेत. म्हणून सांगतो राज ठाकरे जे नेरेटिव्ह सेट करु पाहत आहेत ते जनतेला पटतच नाही. म्हणूनच जनतेचे प्रचंड समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळते आहे, ते वाढतच जाते आहे. आपण जरा डोकावून पहा यात काही शिकण्यासारखे आहे का?," असं आशिष शेलार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.