Join us

राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:57 IST

राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवरुन केलेल्या आरोपांवर मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Ashish shelar on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात  'सत्याचा मोर्चा' काढत निवडणूक आयोगावर टीका केली होती. सगळी कारस्थाने आयोगामार्फत सुरू आहेत, मग आम्ही कशी निवडणूक लढवायची? असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. तसेच दुबार मतदार आल्यावर त्यांना फोडून काढा असेही राज ठाकरे म्हणाले. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. आशिष शेलार यांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आणि महाविकास आघाडीवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. सत्याचा मोर्चात राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचा उल्लेख करताना म्हणताना कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी या मतदारसंघांचा उल्लेख केल्यावर आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का? विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदार तुम्हाला दिसले नाहीत का? असा सवाल शेलार यांनी केला.

"आम्ही मतदारांमध्ये भेद करत नाही पण जे करतात त्यांना आम्ही उघडं करणार आहोत. राज ठाकरे यांनी दुबार मतदारांना फोडून काढा असं म्हटलं. राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण, डोबिंवली, मुरबाड, भिवंडी हे मतदारसंघ सांगितले. निवडणूक यादी शुद्ध असली पाहिजे पण आमची भूमिका स्पष्ट आहे. राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का?  यांना कल्याण डोंबिवली मतदारसंघच दिसतो का? कर्जत जामखेड मतदारसंघात नाव एकसारखे आणि मतदार यादीत नंबर वेगवेगळे पाहायला मिळाले. कर्जत जामखेडमधील दुबार मतदार तुम्हाला दिसले नाहीत का?," असं आशिष शेलार म्हणाले.

राज आणि उद्धव ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही

यावेळी आशिष शेलार यांनी जयंत पाटील, संदीप क्षीरसागर, वरुण सरदेसाई, वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील मुस्लीम दुबार मतदारांची माहिती दिली. "ही नावं तुम्हाला प्रिय आहेत. काँग्रेसला लांगुलचालनाचा रोग लागला आहे. पण राज आणि उद्धव ठाकरेंची बोबडी का वळली आहे? मुस्लीम दुबार मतदाराबद्दल तुमची भूमिका वेगळी आहे. हा वोट जिहाद आहे. राज आणि उद्धव ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही. विचार वापसी करा. ३१ विधानसभा मतदारसंघात मुस्लीम  दुबार मतदारांची संख्या दोन लाख २६ हजार ७९१ आहे. लोकसभेला तुम्ही वोटचोरी केली असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा का," असा सवाल शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या ३१ विधानसभा मतदारसंघांमधील मुस्लीम दुबार मतदारांची आकडेवारी जाहीर केली. 'हा वोट जिहाद आहे' असे स्पष्टपणे सांगत त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. रोहित पवार यांच्या मतदारसंघात ५ हजार ५६२ मुस्लीम दुबार मतदार आहेत. नाना पटोलेंच्या मतदार संघात ४७७, संदीप क्षीरसार यांच्या मतदार संघात १४ हजार ९४४, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात ३०६०१,  ज्योती गायकवाड यांच्या धारावीत १० हजार मुस्लीम दुबार मतदार असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shelar questions Raj Thackeray on 'missing' Muslim duplicate voters.

Web Summary : Ashish Shelar criticized Raj Thackeray for focusing only on Hindu duplicate voters, questioning why he ignored Muslim duplicate voters in MVA constituencies. Shelar alleged 'vote jihad' and demanded clarification from Thackeray.
टॅग्स :आशीष शेलारराज ठाकरेउद्धव ठाकरेभारतीय निवडणूक आयोग